
‘जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार
पनवेल, दि . ०२ ( वार्ताहर ) : सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पनवेल तालुक्यातील मालडुंगे-धोदाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचवाडी या ४० ते ४५ घरांच्या आदिवासी पाड्यावर अद्यापही पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून ही सरकारी योजना गावात पूर्णपणे फेल ठरली आहे. येथील स्थानिक पातळीवर पाण्यासाठी कोणताही ठोस स्त्रोत निघत नसल्याने प्रशासकीय पातळीवर पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, गावाची तहान भागवण्यासाठी सरपंच सिताराम चौधरी यांनी विशेष पुढाकार घेत सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि पाणी पुरवठ्याचे नवीन नियोजन काय करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून आणि पाहणीतून सरपंचांची एक नवीन सकारात्मक संकल्पना समोर आली आहे.
माथेरानच्या कपारीत एक बारमाही वाहणारा नैसर्गिक झरा असून या झऱ्यावरून चिंचवाडी पाड्याला अगदी सहज आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, अशी संकल्पना सरपंच सिताराम चौधरी यांनी मांडली. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि पाणी योजनेचे नवीन नियोजन करण्यासाठी सरपंच सिताराम चौधरी यांच्यासह पंचायत समितीच्या सदस्या वर्षा केवारी, सचिन केवारी, पाणीपुरवठा अभियंता पूजा शेळके आणि चिंचवाडी मधील बाळू उघडे, अनंता कांबडी, विष्णू कांबडी आदी ग्रामस्थांनी थेट माथेरानच्या डोंगर कपारीत जाऊन त्या झऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
“जलजीवन मिशन गावात फेल ठरल्यामुळे आमचे आदिवासी बांधव पाण्यासाठी वणवण करत आहेत, आता आमच्या संकल्पनेतून माथेरानच्या डोंगर कपारीत सनसेट पाॅईंटजवळ पाण्याचा उत्तम स्त्रोत निश्चित झाला असून येथून पाड्यावर पाणी आणण्यासाठी आम्ही आ.प्रशांत ठाकूर,सभापती रंजना वास्कर,उपसभापती भूपेंद्र पाटील आणि गटविकास अधिकारी वाठारकर (BDO) यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करणार आहोत आणि हे नियोजन पूर्ण करूनच थांबणार,” असा विश्वास सरपंच सिताराम चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला. या संयुक्त पाहणी दौऱ्यामुळे आणि सरपंचांच्या या संकल्पनेमुळे आता चिंचवाडीचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रशासन यावर किती वेगाने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



Be First to Comment