
डिजिटल शिक्षणाच्या दिशेने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची महत्त्वपूर्ण झेप
खालापूर : प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासन, कार्यकारणी मंडळ आणि समाज यांच्यात अधिक सुसंवाद व पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी कॉलेजच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
के.जी.पासून पीएच.डी.पर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. एम.सी. कॉलेजसाठी हे संकेतस्थळ एक महत्त्वपूर्ण डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध विभागांची माहिती, निकाल, उपक्रम, सूचना, संस्थेच्या कार्याचा आढावा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने संस्था, विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

खोपोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अशी सक्षम शिक्षणसंस्था ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत गरज असल्याचे नमूद केले. नव्याने सुरू झालेल्या संकेत स्थळाच्या माध्यमातून संस्थेची माहिती अधिक पारदर्शकपणे समाजापर्यंत पोहोचेल आणि आधुनिक शैक्षणिक विकासाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा सकारात्मक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह संचालक मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्व हितचिंतकांचे पूर्ण योगदान कायम राहील, असे अभिवचन देत शैक्षणिक गुणवत्ता, पारदर्शकता आणि नव्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकरंद वझल यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आलेख मांडला. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित करत, विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था भविष्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ हे त्या दूरदृष्टीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
के. एम. सी. कॉलेजच्या सभागृहात आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमास संस्थेच्या संचालक मंडळाचे दिलीप पोरवाल, जितेश ठक्कर, भास्कर लांडगे, बी.एल. पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने, सामाजिक क्षेत्रातील चिंतामण सोनवणे, मनीष खवळे, प्रशांत गोपाळे, संदीप ओव्हाळ, गुरुनाथ साठेलकर, जयंत पाठक, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment