

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील)
मुलुंड (पश्चिम) येथील राहुल नगर, न्यू राहुल नगर, पंचशील नगर, गणेश पाडा, हनुमान पाडा आणि शंकर टेकडी परिसरातील नागरिक मागील चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. अनेक भागांत अनेक दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या गंभीर समस्येच्या निषेधार्थ झोपडपट्टी सेवा संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), मनसे, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली टी-वार्ड कार्यालयावर हंडा-मडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मोर्चा टी-वार्ड कार्यालयावर पोहोचल्यानंतर महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. परिसरात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी मडके फोडून निषेध व्यक्त केला.
मोर्चाचे स्वरूप आक्रोश आंदोलनात परिवर्तित झाल्यानंतर टी-वार्ड पाणी खात्याचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून उद्यापासून संबंधित भागात १०० टक्के नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रभाकर कांबळे, राजेंद्र देशमुख, अनिल झोळेकर, संदीप वारे, हरेश जाधव, विठ्ठल सटपुते, प्रदीप शिरसाट, मुस्ताक बाबा, नागोराव वालवे, महेश धामापूरकर, अंकुश शिंदे, श्यामराव साळवे, लीलाबाई जोगदंड, गोदाबाई जोगदंड, रजना नायर, आशाताई भोजने, सुगंधा तयडे आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.



Be First to Comment