
खानावळेत पर्यावरणाचा संहार! बारवई पुलाखाली दुकानदारांकडून सर्रास कचराफेक
खानावळे (वैभव लबडे) :
खानावळे ग्रामपंचायत हद्दीतील बारवई पूल परिसरात सध्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाच्या परिसरात असलेल्या स्थानिक दुकानदारांकडून व आठवडा बाजार दुकानदारांनी टाकाऊ साहित्य, प्लास्टिक आणि इतर ओला-सुका कचरा थेट पुलाखालील नदीपात्रात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नदीपात्राला कचराकुंडीचे स्वरूप आले असून, या गंभीर बाबीकडे खानावळे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बारवई पूल हा परिसरातील एक महत्त्वाचा दुवा असून या पुलाखालून वाहणार्या नदीच्या पुलाच्या कडेला असलेल्या व्यावसायिक व दुकानदारांनी प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत आपला सर्व कचरा नदीत फेकणे सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने घातक प्लास्टिक, थर्माकोल आणि सडके अन्नपदार्थ समाविष्ट आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना अशा प्रकारे नदीपात्र कचऱ्याने तुंबल्यास आरोग्याचा मोठा अनर्थ ओढवण्याची भीती वर्तवली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कचराफेकीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून संबंधित दुकानदारांवर अद्याप कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे दुकानदारांचे धाडस आणखीनच वाढले असून, दिवसाढवळ्या कचरा नदीत फेकला जात आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीला आपल्याच हद्दीतील या विदारक परिस्थितीचे भान का नाही, असा संतप्त सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून बारवई पुलाखालील कचरा हटवावा आणि नदी प्रदूषित करणाऱ्या दुकानदारांवर कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



Be First to Comment