Press "Enter" to skip to content

धोदाणीत नागरिकांच्या निष्काळजीपणाला सरपंचांचे ‘कृती’ने उत्तर; वारंवार सांगूनही न ऐकल्याने सिताराम चौधरी स्वतः उतरले गटारात!


​पनवेल/प्रतिनिधी : ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे अंतर्गत येणाऱ्या धोदाणी गावातील नागरिकांना “गटारात आणि सार्वजनिक ठिकाणी घाण-कचरा टाकू नका,” असे आवाहन सरपंच सिताराम चौधरी यांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या आणि सरपंचांच्या या आवाहनाकडे काही नागरिकांनी साफ दुर्लक्ष केले. शेवटी लोकांनी ऐकले नाही, म्हणून स्वतः सरपंच साहेबांनी हातात फावडे घेतले आणि थेट गटारात उतरून साफसफाई केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोदाणी गावातील गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. हा कचरा वेळेत साफ केला नसता तर पावसाचे पाणी तुंबून गावात रोगराई पसरण्याचा मोठा धोका होता. नागरिकांना वारंवार समजावून सांगूनही कचरा टाकणे बंद होत नसल्याने, सरपंचांनी केवळ आदेश न देता स्वतः काम करून गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

धोदाणी परिसरातील नाल्यांचे आधीच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा. परंतु, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे हा कचरा पुढे वाहून थेट नदी आणि धरणाच्या पाण्यात जातो. पाणी दूषित होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी सरपंचांनी स्वतः चिखलात उतरून कचरा बाजूला काढला.
​आपल्या लोकप्रतिनिधीला स्वतः गटार साफ करताना पाहून कचरा टाकणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे चपराक बसली असून, सरपंचांच्या या धडक कृतीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. विनाकारण प्रशासनाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, असाच संदेश यातून सरपंचांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.