Press "Enter" to skip to content

शांतता व कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासन सतर्क

बकरी ईद पार्श्वभूमीवर खोपोली व शिळफाटा परिसरात पोलिसांचा रूट मार्च

खोपोली : प्रतिनिधी

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खोपोली शहरासह शिळफाटा परिसरात खोपोली पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा अनुचित प्रकारांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या नेतृत्वात तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला.

खोपोली शहरातील प्रमुख मार्ग, संवेदनशील भाग तसेच शिळफाटा परिसरातून पोलिसांचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीने फिरविण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहन पथक तसेच आवश्यक सुरक्षा यंत्रणा सहभागी झाली होती. बकरी ईदचा सण शांततेत, उत्साहात आणि धार्मिक सौहार्द जपत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी नागरिकांना सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि कायद्याचे पालन करत बकरी ईदचा सण आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी, “प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, मात्र सण-उत्सव साजरे करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे,” असे सांगत नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून, सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

बकरी ईदच्या निमित्ताने खोपोली शहरात बंधुता, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सलोखा कायम राखत सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने खोपोलीकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.