Press "Enter" to skip to content

बकरी ईद पार्श्वभूमीवर खोपोलीत शांतता कमिटीची बैठक; सामाजिक सलोखा जपत सण साजरा करण्याचे आवाहन

खोपोली : प्रतिनिधी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि धार्मिक सुसंवाद कायम राखण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि. २५ मे २०२६ रोजी पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत बकरी ईद या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी सर्व समाजघटकांनी सर्वसमावेशक भूमिका घेत सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीला रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, उपमुख्याधिकारी रणजीत पवार तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नेत्रा असवार उपस्थित होते. यावेळी हिंदू व मुस्लिम धर्मीय सामाजिक स्तरावर कार्यरत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बकरी ईदचा सण धार्मिक सुसंवाद आणि सामाजिक सलोखा जपत साजरा व्हावा. शहरात कोणत्याही प्रकारे तणाव निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या गोष्टींमुळे सणाला गालबोट लागू नये, यासाठी नागरिकांनी संयम आणि जागरूकता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात सार्वजनिक ठिकाणी कत्तल करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट करताना, कुर्बानी प्रक्रिया नियमानुसार आणि परवानगी असलेल्या ठिकाणीच व्हावी, असे सांगण्यात आले. कुर्बानीनंतर रक्ताचे सडे, कचरा, दुर्गंधी किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. नियमांचा भंग झाल्याची लेखी तक्रार प्राप्त झाल्यास पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पशुवैद्यकीय विभाग, पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे सांगताना कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक व विल्हेवाट नगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात यावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी सांगितले की, प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार नमाज अदा करणे, कुर्बानी करणे, कुर्बानीच्या वाट्याचा हिस्सा वाटप करणे आणि सण-उत्सव साजरे करण्याचा सर्वतोपरी अधिकार आहे. मात्र हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहूनच पार पाडले गेले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करणे बंधनकारक असून, केवळ परवानगी असलेल्या प्राण्यांचीच कुर्बानी करता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित प्राणी धार्मिक शास्त्रानुसार तंदुरुस्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणित (सर्टिफाईड) असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. खोपोली शहरात मालकीच्या जागेवर पूर्वपरवानगी घेऊन प्रमाणित ठिकाणीच कुर्बानी करण्यास परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले. कुर्बानी करताना परिसराचे पावित्र्य राखणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित हस्तक्षेप किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी गो तस्करी, अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तल तसेच प्राणी संरक्षण कायदा १९७६ अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. “पोलीस सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत,” असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

खोपोली नगरपालिकेच्या वतीने उपमुख्याधिकारी रणजीत पवार यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत आवश्यक सुविधा व सहकार्याबाबत माहिती दिली. तर उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी सर्वांनी सामाजिक सलोखा अबाधित ठेवून बकरी ईद उत्साहात साजरी करावी, या दृष्टीने नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामाजिक सद्भाव, परस्पर आदर आणि धार्मिक सुसंवाद जपत बकरी ईदचा सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे अभिवचन दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.