
माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक स्वाक्षरी मोहीम सुरु
पनवेल/प्रतिनिधी — गेल्या ६ वर्षांपासून अखंडित वीजपुरवठा आणि भीषण ‘लो व्होल्टेज’च्या समस्येचा सामना करणाऱ्या करंजाडे सेक्टर ५ आणि ५ ए मधील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. महावितरणच्या या उदासीन कारभाराविरोधात आता नागरिकांनी थेट संघर्षाचे पाऊल उचलले असून, करंजाडेचे माजी सरपंच श्री. रामेश्वर आंग्रे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संपूर्ण सेक्टरमध्ये व्यापक ‘स्वाक्षरी मोहीम’ सुरू करण्यात आली आहे.
करंजाडे सेक्टर ५ आणि ५ ए हा वेगाने विकसित होणारा उच्चभ्रू नोड म्हणून ओळखला जातो. महावितरण या भागातून नियमितपणे कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करते. मात्र, येथील मुख्य सप्लाय वाहिनी (Main Supply Cable) गेल्या ६ वर्षांपासून जर्जर अवस्थेत आहे. तिच्यात वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे दिवसातून ४ ते ५ वेळा वीज खंडित होणे ही रोजची बाब झाली आहे. तसेच, गेल्या काही काळापासून येथे ‘लो व्होल्टेज’ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रहिवाशांचे फ्रीज, ए.सी., पाण्याचे पंप आणि इतर महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक होत आहेत. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या पनवेल कार्यालयाकडे वारंवार दाद मागितली, परंतु “निधीची कमतरता आहे” असे पळवाटा काढणारे उत्तर देऊन ६ वर्षांपासून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
.. तर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा: रामेश्वर आंग्रे यांचा इशारा
या जनआंदोलनाचे नेतृत्व हाती घेताना माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी महावितरण प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. “करंजाडेतील नागरिक वेळेवर वीज बिल भरतात, मग त्यांना ६ वर्षे नरकयातना का भोगाव्या लागत आहेत? निधी नाही हे महावितरणचे कारण आम्ही आता सहन करणार नाही. नागरिकांच्या हक्कासाठी ही स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आम्ही हजारो रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांचे हे पत्र घेऊन उरण विधानसभेचे आमदार आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेणार आहोत. आमदार निधी किंवा जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून यासाठी निधी खेचून आणू. मात्र, जर पुढील १५ दिवसांत महावितरणने मुख्य वाहिनी बदलण्याचे काम सुरू केले नाही, तर सेक्टर ५ आणि ५ए मधील हजारो रहिवाशांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात येईल,” असा आक्रमक पवित्रा रामेश्वर आंग्रे यांनी घेतला आहे.
करंजाडेतील सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद
या स्वाक्षरी मोहिमेची घोषणा होताच सेक्टर ५ आणि ५ ए मधील सर्व सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिव आणि रहिवाशांनी एकत्र येत या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. केवळ दोन दिवसांत संपूर्ण सेक्टरमधील हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून महावितरण आणि प्रशासनाचे डोळे उघडण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे.



Be First to Comment