
पनवेल, दि. २४ मे २०२६ पनवेलमधील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने, MGM हॉस्पिटल व दारुल अमन ट्रस्ट यांच्या सहकार्याने ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ईद-उल-अजहा, अर्थात बकरी ईद, हा “कुर्बानी” म्हणजेच त्याग, समर्पण आणि परोपकार यांचा संदेश देणारा पवित्र सण आहे. इस्लाम धर्मातील परंपरेनुसार, पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशाप्रती निष्ठा आणि समर्पण दर्शवित आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करण्याची तयारी दाखवली. त्याच स्मरणार्थ “कुर्बानी”ची परंपरा आजही पाळली जाते, जी मानवतेसाठी त्याग आणि सेवाभाव यांची शिकवण देते.
या भावनेतून समाजातील गरजूंसाठी रक्तदान आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी कुर्बानी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
धर्माने सांगितलेल्या “त्याग” (कुर्बानी) या महान मूल्याची जाणीव ठेवत सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्ताची तातडीची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरात एकूण ३५ युवकांनी रक्तदान केले आणि अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये दारुल अमन ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) पनवेल, MMNF पनवेल, मकतब-ए-नूरुल उलूम, ए. एफ. टी. ट्रस्ट, मिशन माणुसकी आणि ग्राम स्वराज्य समिती, महाराष्ट्र या संस्थांनी मोलाचे योगदान दिले.
या प्रसंगी नगरसेवक समीर ठाकूर, अल्लाउद्दीन शेख, संतोष ढोरे, अब्दुल हमीदखान इनामदार, अरिफ कुरेशी, हाजी सय्यद, अमन अख्तर तसेच महा. (अंनिस) पनवेल शाखेचे प्रधान सचिन पूजा उपस्थित होत्या.
आयोजकांनी सर्व नागरिकांचे आभार मानत, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन केले.



Be First to Comment