Press "Enter" to skip to content

“हरवलेले मोबाईल पुन्हा हातात; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद”

खोपोली : प्रतिनिधी

कधी गर्दीत, कधी प्रवासात, तर कधी नकळत हरवलेला मोबाईल परत मिळेल अशी आशाच अनेकजण सोडून देतात. मात्र खोपोली पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अशा ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी ‘CEIR’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या आधुनिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. त्यातून तब्बल ८ लाख २४ हजार रुपये किंमतीचे ४० मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले.

विशेष म्हणजे हे मोबाईल केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमध्ये वापरात असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोबाईल शोधून काढण्यात आले.

दि. २३ मे २०२६ रोजी खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वीही खोपोली पोलिसांनी १२२ गहाळ मोबाईल हस्तगत केले असून, आतापर्यंत एकूण १६२ मोबाईल फोन, सुमारे ४० लाख ३१ हजार ३०० रुपयांच्या किमतीचे, शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड, रामा मासाळ, निलेश कांबळे, वाल्मीक वाडगे, शुभम जाधव, किरण देवकाते, आकाश डोंगरे, समीर पवार आणि प्रशांत दबडे यांनी अथक परिश्रम व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर यशस्वीपणे पार पाडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.