Press "Enter" to skip to content

विद्याधर गोपीनाथ पाटील यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


प्रतिनिधी आवरे (सचिन पाटील) रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता खालापूर जि रायगड या विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री विद्याधर गोपीनाथ पाटील यांना यावर्षी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सदर पुरस्कार वितरण ५जून २०२६ रोजी माजी शिक्षक आमदार मा श्री बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. श्री विद्याधर पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री अनिल नाचपल्ले यांनी यासंदर्भातील निवडपत्र दिले आहे. विद्याधर पाटील यांनी विज्ञान, शिक्षणशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कायद्याचे पदवीधर आहेत.त्यांनी आतापर्यंत वर्तमान पत्रातून शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देणारे लेखन केले आहे.राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंधाचे लेखन आणि सादरीकरण केले आहे.

राज्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार निवड समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे.शालेय स्तरावर विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणे, करिअर विषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे, शिक्षकांचे उद्बोधन करणे, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य मिळवून देणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. श्री विद्याधर पाटील यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार, कुलाबा जीवनगौरव पुरस्कार, आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार, लोकप्रिय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार, कळंबोली भूषण पुरस्कार , स्टेट आयकॉन रिसर्च पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. श्री विद्याधर पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.