
वरसे-भुवनेश्वर परिसरातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण प्रकरण तापले : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार रोहा यांना चौकशीचे आदेश
रोहा : पुजा पाटील
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे व भुवनेश्वर परिसरातील सरकारी जमिनींवरील कथित अतिक्रमण प्रकरण आता प्रशासनाच्या पातळीवर पोहोचले असून जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांनी याबाबत तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले आहेत.
निवी, पो. वरसे येथील रहिवासी श्री. समीर रामा बामुगडे यांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करून परिसरातील सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप केला होता. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ५३ व ५४ नुसार संबंधितांवर कठोर कारवाई करून अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली होती.
या अर्जाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार यांनी रोहा तहसीलदार यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात शासनाच्या प्रचलित निर्देशांनुसार संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच अर्जदाराला समुचित उत्तर द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सदर पत्रामुळे वरसे-भुवनेश्वर परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाची मोठी चर्चा असून सरकारी जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, चौकशीनंतर नेमकी कोणती कारवाई होते आणि अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्यांवर महसूल विभाग कोणती पावले उचलतो, याकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.



Be First to Comment