Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले आणि प्रशासनाला दिले निवेदन

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना पूर्ण टोलमाफी द्या; आरपीआय पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांची मागणी

काम अपूर्ण असताना टोलवसुली सुरू केल्याने रायगड वासियांमध्ये तीव्र संताप

पनवेल: प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा (पनवेल-इंदापूर पट्टा) टोलनाक्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १५ मे पासून अधिकृतपणे टोलवसुली सुरू केली आहे. मात्र, महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना आणि कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना ही टोलवसुली सुरू केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, रायगड जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्ण माफी देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात निलेश सोनावणे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष (नवी दिल्ली), प्रादेशिक अधिकारी व प्रकल्प संचालक (NHAI रायगड) आणि रायगडचे जिल्हाधिकारी यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे.

रस्त्याचे काम अपूर्ण, सुविधा शून्य आणि टोल मात्र अव्वाच्या सव्वा!
सध्या खारपाडा टोलनाक्यावर कारसाठी एकेरी प्रवासासाठी ९५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १४५ रुपये आकारले जात आहेत. यावर बोलताना आरपीआयचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे म्हणाले की, “या महामार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. टोलनाक्यावर रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे आणि क्रेन यांसारख्या अत्यंत आवश्यक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध नाहीत. असे असतानाही प्रवाशांकडून सक्तीने टोल वसूल केला जात आहे, हा जनतेवर मोठा अन्याय आहे.”

निवेदनातील प्रमुख मागण्या:
१. स्थानिक वाहनांना टोलमाफी: रायगड जिल्ह्यातील (MH-06) आणि पनवेल परिसरातील (MH-46) स्थानिक वाहनांना या टोलमधून पूर्णपणे सवलत (माफी) देण्यात यावी.
२. मूलभूत सुविधांची पूर्तता: टोलनाक्यावर तातडीने रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे आणि क्रेन या सुविधा सुरू करण्यात याव्यात.
३. स्थानिकांना रोजगार: खारपाडा टोलनाक्यावर पेण आणि पनवेल तालुक्यातील स्थानिक गरजू तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.

टोल सुरू झाल्यामुळे पेण, पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाने आणि संबंधित मंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेऊन स्थानिकांना दिलासा दिला नाही, तर आरपीआय पक्षाच्या वतीने नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.