पाण्यासाठी करणार कामोठे जल केंद्रावर एल्गार

पनवेल /प्रतिनिधी.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे आहे परंतु याची जलवाहिनी पनवेल महानगरपालिका हद्दीतून जात असून त्याचे वितरण केंद्र पनवेल पालिका हद्दीतील कामोठे या भागात आहे. या वितरण केंद्रातून किमान ३० एम एल डी पाणी पनवेल महानगरपालिकेला द्यावे अशी मागणी वारंवार करण्यात आलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, आयुक्त पनवेल महानगरपालिका, विभागीय आयुक्त कोकण भवन, जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, खासदार श्रीरंग बारणे, महापौर पनवेल महानगरपालिका यांना या पाण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेला पनवेल महानगरपालिका सचिव प्रकाश म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेविका मनीषा म्हात्रे, गटनेते व नगरसेवक केतन भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, महानगरपालिका कार्यालयीन चिटणीस देवेंद्र मढवी आदी मान्यवर उपस्थित होते
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावे तसेच शहर परिसरामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल परिसराचा विकास झपाट्याने होत असताना पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून पाणी प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कामोठे येथून नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो त्या वितरण केंद्रावर भव्य जन मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
(चौकट )
जनमोर्चाच्या प्रमुख मागण्या.
(1) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तातडीने ३० एम एल डी अतिरिक्त पाणी मंजूर करावे.
(2) २९ गावासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी जल योजना जाहीर करावी.
(3) पाणीपुरवठ्यातील अनियमितता तातडीने थांबवावी.
(4) सिडको पनवेल महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका या संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी.




Be First to Comment