Press "Enter" to skip to content

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात विशेष बैठक

विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर (VAMC) भूसंपादनातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी

विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर (VAMC) च्या भूसंपादनामध्ये शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित होत असून अनेक शेतकऱ्यांना सन-2024 च्या दरम्यान मोबदल्याचे पैसेही मिळाले आहेत. मधील 2 वर्षाच्या कालावधीत प्रशासकीय अडचनीमुळे उर्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्याच्या वाटपाचे काम थांबलेले होते व आता हे मोबदला वितरणाचे काम सुरू होत असताना मोबदला रक्कम मात्र कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याविषयात आमदार विक्रांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात विशेष बैठक लावण्याची मागणी केली. त्यानुसार आज महसूल मंत्री यांच्या दालनात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ही विशेष संपन्न झाली.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावना मांडताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर (VAMC) मध्ये यापूर्वी सुमारे 50% शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला आहे व त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सुध्दा रक्कम कमी न करता पूर्वी इतकाच अथवा शक्य असल्यास जास्तीचा मोबदला देण्यात यावा. पुणे येथील जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये मा. उच्च न्यायालयानी दिलेले निर्देश हे पूर्वीचा मोबदला वाटप सुरु झालेल्या प्रकल्पाना लागू होतात का याची खात्री करावी तसेच विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर (VAMC) हा सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून सर्व शेतकरी योग्य मोबदला घेण्यास तयार असताना उगाचच मोबदला कमी झाल्याने अडचणी तयार होत आहेत. त्यामुळे योग्य तो निर्णय करून या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्हाधिकारी व इतर संबधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, एखाद्या प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणादमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना यापूर्वीच मोबदला दिला गेला असल्यास त्यांनतर एखाद्या विषयात न्यायालयाने दिलेला निर्णय हा पूर्वीच्या प्रकल्पाला लागू करावा किंवा कसे तपासून पहावे लागेल व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्यात यावा. याविषयात कॅबिनेट बैठकीच्या निर्णयाची आवश्यकता पडल्यास त्यासाठीही आम्ही सकारात्मक आहोत असे ही मंत्री महोदयांनी सांगितले.

महसूल मंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारची भूमिका शेतकऱ्यांना न्याय देण्याची असून त्यासाठी जे अधिकाधिक चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये उपस्थित शेतकरी व प्रतिनिधीनीसुध्दा आपली भूमिका व भावना मांडल्या, त्यावरही महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील ही श्वास्वती त्यांनी दिल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सर्व उपस्थित त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार विक्रांत पाटील यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.