Press "Enter" to skip to content

महसूल मंत्र्यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन

खारघर मधील 29 वर्षीय युवक अँड. महेश लोहार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या विषयात आमदार विक्रांत पाटील आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी

खारघर येथे दि. 4 मे 2026 रोजी 29 वर्षीय युवक अँड. महेश लोहार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यू प्रकरणामुळे खारघरवासीयांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. खारघर शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या अवैध वाहतुकीकडे प्रशासकीय यंत्रणा वारंवार डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या सर्व विषयाला वाचा फोडण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस महसूल विभाग, पर्यावरण विभाग, आरटीओ, पोलीस विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य तसेच नागरिकांच्या भावना मंत्री महोदयांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या अपघाती प्रकरणात केवळ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित वाहन ज्या ठिकाणावरून माल भरून निघाले होते तसेच त्यामध्ये अतिरिक्त गौण खनिज भरले गेले होते, त्या मूळ Principal Employer वरदेखील कारवाई करणे आवश्यक आहे
आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, Godrej Properties या व्यावसायिक संस्थेने आवश्यक महसूल विभाग तसेच इतर संबंधित विभागांच्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या का, याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार विक्रांत पाटील यांनी केली.

“धनाढ्य व्यावसायिकांच्या मनात आम्ही काहीही करू शकतो ही निर्माण झालेली भावना मोडीत काढणे तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना योग्य संदेश देणे अत्यंत गरजेचे आहे” असेही आमदार विक्रांत पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित सर्व ठिकाणी शासकीय नियमांनुसार रॉयल्टी भरण्यात आली आहे की नाही, तसेच पर्यावरण विभाग व इतर संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच घेतलेल्या परवानग्या आणि प्रत्यक्ष कामामध्ये झालेल्या उल्लंघनातील तफावत तपासण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

“एखाद्या युवकाचा जीव जात असेल आणि त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष कारणीभूत असेल, तर ते कदापिही सहन केले जाणार नाही.” असे स्पष्ट शब्दांत महसूल मंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीदरम्यान महसूल विभाग तसेच आर.टी.ओ. विभागाच्या गौण खजिज व त्याची अवैध वाहतूक या विषयाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.

आमदार विक्रांत पाटील यांनी पुढील काळात शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करून अशा वाहनांसाठी केवळ महामार्गाचा वापर सक्तीने करण्यात यावा, अशी मागणीही बैठकीत केली.

या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले असून, या विषयावरील पुढील बैठक 20 मे 2026 रोजी आयोजित करण्याचे निर्देशही दिले आहेत.

दुर्दैवी अपघाती मृत्यु झालेल्या अँड. महेश लोहार याचे सहकारी व खारघर मधील युवा ओंकार काळभोर, विकास सोमवंशी, प्रथमेश काळभोर, अमोल कोकारे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.