
इरशाळवाडीत ट्रेकदरम्यान २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ असलेल्या इरशाळवाडी येथे सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत डोंबिवली येथील एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ट्रेकिंगसाठी आलेल्या पाच मित्रांच्या समूहातील हा युवक अचानक अस्वस्थ झाल्यानंतर बेशुद्ध पडला होता. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेच्या तत्परतेने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सर्व युवक डोंबिवली येथील असून त्यांची नावे साहिल सुर्वे (२०), युवराज चव्हाण (२०), मितेश गुप्ता (२०), देवेश गुप्ता (२०), क्रिश शेट्टी (२०) आणि रितेश कोणका (२०) हे मित्र इरशाळवाडी परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकदरम्यान रितेश कोणका याला अचानक त्रास जाणवू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला.
या घटनेनंतर त्यापैकी दोन युवकांनी तातडीने इरशाळवाडीच्या पायथ्याशी येऊन ग्रामस्थांना माहिती दिली.
स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत युवकाला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खालापूर पोलीस स्टेशनलाही या घटनेची माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, हेल्प फाउंडेशनची टीम देखील मदतीसाठी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत युवकाला पारंपरिक झोळीच्या साहाय्याने खाली आणण्याचे काम सुरू ठेवले. पायथ्याशी आधीच ॲम्बुलन्स आणि अन्य आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती.
त्यानंतर संबंधित युवकाला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी काही वेळातच त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मृत युवक रितेश कोणका (वय २०) हा डोंबिवली पश्चिम, कोपर परिसरातील रहिवासी असून तो एस.आय. कॉलेज, डोंबिवली येथे शिक्षण घेत होता.
या संपूर्ण घटनेत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चौक आउट पोस्टचे प्रभारी पीएसआय विशाल पवार यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. .
या दुर्दैवी घटनेमुळे ट्रेकिंगसाठी येणाऱ्या युवकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत योग्य काळजी घेणे, पुरेसे पाणी आणि आवश्यक वैद्यकीय खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.



Be First to Comment