
भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप
पनवेल (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत एकहाती सत्ता मिळवली. हा आनंद देशभर साजरा करण्यात आला, त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाचा जल्लोष पनवेल शहरातही उत्साहात साजरा करण्यात आला.
भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी “भारत माता की जय” आणि “भाजपचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृहनेते प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, शहर अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंझारराव, नगरसेवक अजय बहिरा, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रशांत शेट्ये, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा विजय देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन करत आगामी काळातही अशाच प्रकारे जनतेचा विश्वास संपादन करण्याचा संकल्प व्यक्त केला.


Be First to Comment