Press "Enter" to skip to content

प्रतिकूलतेवर मात :उरणची लेक प्रियांशी जामनेकर तालुक्यात प्रथम!

तृप्ती भोईर : उरण

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे अकोला जिल्ह्यातील अनकवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या एका कन्येने सिद्ध केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात प्रियांशी आशाराम जामनेकर हिने ८७.५०% गुण मिळवून संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. प्रियांशीचे हे यश कौतुकास्पद आहे, कारण या यशाची पायाभरणी तिच्या आईच्या अखंड श्रमातून झाली आहे.

प्रियांशीचे कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील अनकवाडी गावचे असले तरी तिचे वडील आशाराम जामनेकर उरणमध्ये एसटी बस चालक म्हणून कर्तव्य बजावतात. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी आई मुक्ता आशाराम जामनेकर या उरणमध्ये वडापावचा व्यवसाय करतात. आई दिवसभर कष्ट करून जो पैसा कमवते, त्या कष्टाची जाण प्रियांशीने अभ्यासातून दाखवून दिली. घराची बेताची परिस्थिती असूनही केवळ जिद्दीच्या जोरावर तिने उरण तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला.

प्रियांशीने तिचे बारावीचे शिक्षण सिटीझन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथून पूर्ण केले. तिला सादिक सर, शैलेंद्र प्रजापती सर, नरेंद्र पाटील सर, प्रमोद पाटील सर आणि साजिया मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, ‘स्वामी विवेकानंद’ कोचिंग क्लासचे दत्तात्रय शेळके सर व मयूर पाटील सर यांचीही तिला मोलाची साथ लाभली.
प्रियांशीची हुशारी दहावीपासूनच सर्वांच्या परिचयाची होती. दहावीत असताना स्नितील पडते यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तेव्हाही आपल्या विषयांवरील पकड आणि हुशारी दाखवली होती दहावीत ही तिने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये तिसरा क्रमांक मिळवून यशाचा पाया रचला होता.

सध्या म्हातवली येथील साई दर्शन सोसायटीत राहणाऱ्या प्रियांशीला भविष्यात ‘इंजिनीयर’ व्हायचे आहे. कॉम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या आधुनिक विषयात उच्च शिक्षण घेऊन तिला आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करायचे आहे. प्रियांशीच्या या यशामुळे संपूर्ण उरण तालुक्यातून तिच्यावर आणि तिच्या कष्टाळू आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.