Press "Enter" to skip to content

धिरेंद्र शास्त्रींविरोधात जोडे मारो आंदोलन

अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; पनवेल काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी

पनवेल:
२०२३ साली संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी सोमवार दि. २७ एप्रिल रोजी पनवेल काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून राजकीय फायद्यासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला. “दि. १६ आणि १७ एप्रिल रोजी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. त्यावेळी महिला आरक्षणाचे बिल असल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ते डिलिमिटेशनशी जोडलेले बिल होते. काही राज्यांमध्ये निवडणुकीत फायदा व्हावा आणि भाजप कायम सत्तेत राहावी, या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “जर सरकारला महिला आरक्षण खरोखरच लागू करायचे होते, तर २०२३ मध्ये मंजूर झालेले विधेयक २०२४ पासून लागू करता आले असते. मात्र तसे झाले नाही. आमची मागणी आहे की २०२६ ची जनगणना तातडीने करावी आणि त्यानुसार आरक्षण लागू करावे. तसेच एससी आणि एसटी महिलांप्रमाणेच ओबीसी महिलांनाही प्रतिनिधित्व द्यावे. आमच्या या मागण्या मान्य झाल्यास आम्ही या विधेयकाला पूर्ण समर्थन देऊ.” सरकारवर टीका करताना त्यांनी “हे सरकार फसवे असून महिलांना केवळ आश्वासने देत आहे,” असा घणाघात केला.

या वेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका लीला कातकरी, कार्याध्यक्ष शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे, शैलेश पाटणे, अमित दवे, सुरेश पाटील, अरुण कुंभार, प्रितेश साहू, हेमराज म्हात्रे, आरती ठाकूर, सुदेशना रायते, जयश्री खटकले, दीपा ढोले, चेतन म्हात्रे, बबन केणी, जयवंत देशमुख, अखिल अधिकारी, शाहीद मुल्ला, स्वराज पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत संध्या सव्वालाखे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा कृतीवर आरोप केले. “नुकतेच मी नागपूरहून विमानाने प्रवास करत असताना मोहन भागवत माझ्या शेजारच्या पहिल्या सीटवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी मला प्रसाधनगृहासाठी देखील उठू दिले नाही. त्यावेळी माझी प्रकृती ठीक नव्हती. माझ्यासारख्या महिलेलाही वेठीस धरले गेले. हाच का या सरकारचा महिलांप्रती सन्मान?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ यांच्यावर निशाणा-
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना सव्वालाखे म्हणाल्या, “चित्रा वाघ या महिलांच्या बाजूने कधीच उभ्या राहिलेल्या नाहीत. जर त्या खऱ्या अर्थाने महिलांच्या बाजूने असतील, तर नाशिक प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी.” तसेच, “माझ्यासमोर बसून त्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असे खुले आव्हानही त्यांनी दिले. महिला आरक्षणावर बोलताना “तुम्ही आमदार झालात म्हणून महिलांचे दुःख समजेलच असे नाही. आजही ओबीसी महिला आरक्षणापासून दूर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

धिरेंद्र शास्त्रींविरोधात आंदोलन-
पत्रकार परिषदेनंतर बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. धिरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जोरदार घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच धिरेंद्र शास्त्री यांचे छायाचित्र पायदळी तुडवत निषेध नोंदविण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.