Press "Enter" to skip to content

पळसदरी डॅममध्ये 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

डॅमने घेतला तरुणाचा जीव!
पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅम परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला.
आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला.

अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला एडवेंचर चे गणेश गीध आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.