Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये लेन्सकार्टचा निषेध आणि आंदोलनाचा इशारा

पनवेल(प्रतिनिधी) लेन्सकार्ट  कंपनीच्या काही शाखांमध्ये कार्यरत हिंदू कर्मचाऱ्यांवर त्यांच्या धार्मिक आचरणांबाबत निर्बंध घातले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, काही शाखांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू, टिळा, गंध लावण्यास तसेच हातावर धार्मिक दोरा धारण करण्यास मनाई करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी हिंदू सण साजरे करण्यावरही बंधने घालण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो भारताच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. या संदर्भात नवीन पनवेल युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष मयूर कदम यांनी पनवेल येथील लेन्सकार्ट  व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हंटले आहे कि, भारत हा विविध धर्मांचा देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार व धार्मिक परंपरांनुसार आचरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कंपनीकडून विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालणे हे अयोग्य व निषेधार्ह आहे. म्हणूनच, संबंधित प्रकार तात्काळ थांबवून कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची हमी द्यावी. या संदर्भात कंपनीकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास नवीन पनवेल युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेन्सकार्ट व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. यावेळी मयूर कदम यांच्या समवेत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.