Press "Enter" to skip to content

“समतेचा दीप प्रज्वलित; खोपोलीत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न”

खोपोली प्रतिनिधी : दिनकर भुजबळ

खोपोली शहरात सामाजिक समतेचा आणि अध्यात्मिक मूल्यांचा दीप पुन्हा एकदा तेजाने प्रज्वलित झाला, निमित्त होते जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, खोपोली (जि. रायगड) यांच्या वतीने आयोजित हा भव्य-दिव्य सोहळा रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी लायन्स क्लब हॉल येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

१२ व्या शतकातच सामाजिक परिवर्तनाचे धाडसी बीज रोवणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी स्त्री-पुरुष समानतेचा ध्वज उंचावत जगातील पहिली लोकशाही संसद — अनुभव मंडप स्थापन केली. “कायकवे कैलास” या तत्वज्ञानातून श्रमाला सर्वोच्च स्थान देत, “कर्म हाच धर्म” आणि “दासोह” या मूल्यांद्वारे समाजहिताची दिशा दिली. त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेला ठाम नकार देत सर्व जाती-धर्मांना समानतेचा अधिकार बहाल केला, तसेच स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला—हीच त्यांची विचारधारा आजही समाजाला प्रेरणा देते.
या सोहळ्यास कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. महेंद्र शेठ सदाशिव थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष श्री. रामदास कोंडू शेंडे होते. यावेळी सौ. शिवानी जंगम, व मा. सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र बोडके, तसेच उद्योजक मा. आनंद गवी (वाशी, नवी मुंबई) यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात प्रा. अविनाश मोरे व डॉ. प्रभाताई वाडकर (संशोधक व लेखिका) यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून बसवेश्वरांच्या विचारांचा आधुनिक संदर्भ मांडत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. त्यांच्या भाषणांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित केला.
यावेळी मान्यवरांचा सत्कार प्रा. आण्णासाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सौ. रेखा कोरे यांनी केले, तर संयोजनात श्री. रमेश मंजुनाथ पाटील (अध्यक्ष), श्री. जितेंद्र कोरे (कार्यवाह), प्रा. शैलेश शिवदे (सहकार्यवाह) व सौ. विणा रमेश पाटील (महिला संघटक) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती लक्ष्मी गुदे व सौ. सुप्रिया वारील यांनी प्रभावीपणे केले, तर श्री. जितेंद्र कोरे यांनी आभार प्रदर्शन सादर केले.
समाजातील समतेची, श्रमप्रतिष्ठेची आणि निःस्वार्थ सेवेची शिकवण देणारा हा सोहळा केवळ एक उत्सव नव्हता, तर नव्या सामाजिक जागृतीचा संकल्प सोहळा ठरला—अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.