Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये ‘खुशरंग’ संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; रसिक मंत्रमुग्ध

 

पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खुशरंग’ संगीत महोत्सव शेकडो संगीत रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या दिमाखात पार पडला. मार्केट यार्ड येथील सभागृहात सायंकाळपासूनच रसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शास्त्रीय गायन, भजन आणि कथक नृत्य यांचा सुरेल संगम अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी नामवंत कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून सभागृहात सुरांची मैफल रंगवली. प्रत्येक कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवाचा शुभारंभ पं. गिरीश संझगिरी, ह.भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, पं.मारूती पाटील,पं. उमेश चौधरी, उस्ताद रफात खान नियाजी, नागनाथ पाटील व विनोद तोडेकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. महोत्सवात पहिले पुष्प पं. गिरीश संझगिरी यांनी गुंफले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग ‘पुरिया धनाश्री’ मधील ‘अब तो ऋतु मान’ हा बडा खयाल तर तीन तालात ‘बीत गये जुगवा पिहरवा’ हा छोटा खयाल सादर केला. त्यानंतर “ज्ञानीयांचा राजा”या अभंगाने आपल्या गायनाची सांगता केली. कार्यक्रमाचे दुसरे पुष्प पं. महेश कुलकर्णी यांनी गायनाची सुरुवात राग ‘श्री कल्याण’ मधील ‘अजहून आये’ बडा खयाल तर छोटा खयाल ‘झननन बाजे पायलीयां’ सादर केला. त्यानंतर राग सोहनी मधील छोटा खयालाने आपल्या गायनाची सांगता केली. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प पं. विनायक नाईक यांच्या संकल्पनेतून साकार केला. गायन, वादन,नृत्य एक अविष्कार हा कार्यक्रम आर्या महाजन, ऋतुजा कुलकर्णी यांचे नृत्य आणि या नृत्याबरोबर विनायक नाईक व सहकाऱ्यांनी तीन तालामध्ये कायदे, तुकडे, रेळे यांचे वादन व जुगलबंदी सादर झाली.  कार्यक्रमाचा समारोपही अत्यंत भारदस्त वातावरणात झाला. उस्ताद अस्लम खान यांचे शिष्य पं. उमेश चौधरी यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘बिहाग’ रागातील ‘श्रीराम श्रीराम जय जय राम’ या बडा खयाल ने तर ‘अब तो रट लागी’या छोट्या खयालाने केली.त्यानंतर खमाज रागामध्ये ठुमरी तसेच ‘केतकी गुलाब जुही चंपक बन फुली’ आणि शेवटी ‘वैकुंठीच्या राया’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांच्या दाणेदार, प्रभावी आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.

सदर कलाकारांना संवादिनी साथ पं. विनायक ललित, स्मिता मनोहर तर तबलासाथ विनायक नाईक, प्रसाद सुतार, महेश कानोळे तर पखवाज सोमदत्त माने व सूरज गोंधळी तसेच नृत्याबरोबर गायन साथ तनुश्री जोग व सुधींद्र बागल यांनी दिली तर सूत्रसंचालन सोपान आढाव यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कलाकारांसह महोत्सवाचे निमंत्रक ह.भ.प. वसंत पाटील, विनोद तोडेकर, अक्षय चौधरी, अनिल कोळी ,जगदीश म्हात्रे,मच्छींद्र पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या सुरेल मैफलीमुळे पनवेलकर संगीतप्रेमींना अविस्मरणीय असा सांस्कृतिक सोहळा अनुभवता आला. आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कलाकार, सहवादक आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.