Press "Enter" to skip to content

मागण्या लवकरच पूर्ण करू – मंत्री आशिष शेलार 

लोकनेते रामशेठ ठाकूर ‘सेवासम्राट’ –  मंत्री आशिष शेलार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव


पनवेल (प्रतिनिधी) मला सर्वात आवडलेलं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या भाषणातील एक वाक्य आहे ते म्हणजे आम्हाला आंदोलनाची सवयच आहे. तुमचा जसा आंदोलनाचा पिंड आहे तोच आमचाही आहे, पण मंत्री झाल्यापासून जरा त्या भूमिकेला आवर घालावा लागतोय, मात्र तुम्हाला आंदोलन न करू देता पुढच्या वेळी या महोत्सवाला येईन त्याच्या आधी तुमच्या संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या असतील, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी उलवे नोड येथे झालेल्या सी-फूड फेस्टिवल आणि आगरी-कोळी महोत्सवाच्या सांगता कार्यक्र्रमावेळी दिली.

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप पुरस्कृत श्री गणेश सामाजिक मंडळ, गव्हाण यांच्या वतीने आयोजित उलवे नोड सी-फूड फेस्टिवल आणि आगरी-कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उलवे येथील रामशेठ ठाकूर मैदानावर २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत रंगलेल्या या महोत्सवाची सांगता मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना ना. शेलार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव ‘सेवासम्राट’ असा केला. आकडे आणि रकमा रामशेठ यांच्या कार्यापुढे तोकड्या पडतात, परंतु त्यांच्या हृदयातून वाहणारा सेवेचा झरा कधीच आटत नाही, असे सांगत इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात रामशेठ ठाकूर यांची ओळख सेवासम्राट म्हणूनच होईल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, येणाऱ्या वर्षभरात आगरी-कोळी संस्कृतीचा हा सांस्कृतिक ठेवा कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवला जाईल तसेच त्यांनी जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेश बालदी यांच्या कार्याचेही विशेष कौतुक केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर भाषणात म्हणाले की, उलवे नोडमध्ये शिवसृष्टी उभी राहावी अशी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे, मात्र सिडकोचे अधिकारी इतके मुजोर बनले आहेत की, कवडीमोल भावाने आमच्याकडून घेतलेली जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एकरी पाच कोटी रुपये मागत आहेत हे दुर्दैवी आहे. महाराजांची शिवसृष्टी इथे उभी राहावी यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही सिडकोसोबत संघर्ष करतोय. आमचे दोन्ही आमदार सिडकोच्या विरोधात विधीमंडळात आवाज उठवत आहेत. राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारवर आमचा विश्वास आहे म्हणून, नाही तर सिडकोविरोधात आम्ही मोठे आंदोलन उभे केले असते. तसे आंदोलन आम्ही यापूर्वी वेळोवेळी उभे केले आहे

सिडकोने ही जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी, आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी उभी करू, अशी मागणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली, तर आमदार महेश बालदी यांनीही आगरी-कोळी समाजाची संस्कृती रूजवण्यासाठी अशा महोत्सवांना शासनाकडून पाठबळ मिळावे, अशी मागणी केली.

या महोत्सवामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे आणि कीर्तनकार निवृत्तीबुवा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. समारोप सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, प्राची जाधव, सोनाली जितेकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, रतनशेठ भगत, सचिन घरत, हेमंत पाटील, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, साईचरण म्हात्रे, सुहास गोंधळी, प्रतीष पाटील, अमित नाईक, प्रणय कोळी, राहुल घरत, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि आगरी-कोळी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चार दिवसीय महोत्सवात परिसरातील नागरिकांना आगरी-कोळी समाजाच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा, परंपरांचा आणि जीवनशैलीचा अनोखा अनुभव घेता आला. विविध पारंपरिक सी-फूड पदार्थांची चव आणि स्थानिक कलावंतांच्या सादरीकरणामुळे या महोत्सवात मोठी रंगत आली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.