
प्लॅटफॉर्मवरील शेड अधांतरी… प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासनाचे निष्क्रियतेचे ‘उघडे वस्त्र’
दि. ३ मुंबई प्रतिनिधी:(सतिशपाटील)
मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म शेडची कामे अक्षरशः अर्धवट अवस्थेत टांगणीला लागली असून, प्रवाशांच्या डोक्यावरचे सावलीचे छत्रच हिरावून घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ऐन कडक उन्हाळ्यात प्रवाशांना तळपत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. या सगळ्या गोंधळात रेल्वे प्रशासन मात्र ‘झोपेचे सोंग’ घेतल्यासारखे वागत असल्याची तीव्र टीका होत आहे. केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, खासदार संजय दिना पाटील यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे असे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याचे खा.संजय दिना पाटील यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील अनेक स्थानकांवर जुनी, जीर्ण झालेली शेड काढून टाकण्यात आली. मात्र त्याजागी नवीन शेड उभारण्याची तसदी अद्याप घेतलेली नाही. परिणामी, प्रवासी अक्षरशः ‘आभाळाच्या छत्राखाली’ उभे राहण्यास भाग पडले आहेत. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार, तसेच वयोवृद्ध नागरिक सर्वांनाच या व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा फटका बसत आहे.
रेल्वे विभागाची कामे इतक्या संथ गतीने सुरू आहेत की, काम चालू आहे, हा फलकच जणू कायमस्वरूपी लावून ठेवला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भांडुप, घाटकोपर स्थानक हे याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. येथे प्लॅटफॉर्मवरील शेड काढून टाकली आहे तर प्लॅटफार्मवर पत्र्यांनी जागा अडवण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी उपलब्ध जागा अधिकच कमी झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने उन्हात थांबावे लागते. अशा स्थितीत आजारी तसेच वयोवृध्द व्यक्तींना उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. अशा घटना काही ठिकाणी घडल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून ही परिस्थिती कायम असताना, प्रशासन मात्र ‘कागदोपत्री विकास’ दाखवण्यात व्यस्त असल्याची टीका होत आहे. खा. संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अशा महत्त्वाच्या व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड करणारे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
पावसाळा तोंडावर असताना, हीच परिस्थिती कायम राहिली तर प्रवाशांना आणखी गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गर्दीच्या वेळी घसरून होणाऱ्या अपघातांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवरील शेड व इतर कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रवाशांच्या सोयीसुविधा की फक्त दिखाऊ विकास? असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत.




Be First to Comment