Press "Enter" to skip to content

पनवेल शहर वाहतूक शाखेने राबवली रात्री विशेष तपासणी


पनवेल दि.०२ (वार्ताहर) : पनवेल शहरात वाढत चाललेली अवैध प्रवासी वाहतूक आणि रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेने गुरुवारी रात्री विशेष तपासणी आणि नाकाबंदी मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पनवेल आरटीओच्या सहकार्याने ही कारवाई रात्री १० ते १२ वाजेच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम परिसरात करण्यात आली. या मोहिमेत विनापरवाना रिक्षा चालवणारे, गणवेश नसलेले, फिटनेस आणि विम्याची मुदत संपलेली वाहने, तसेच तीव्र प्रकाशाच्या हेडलाईट्सचा वापर करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला.

या मोहिमेदरम्यान एकूण १२० रिक्षांची कसून तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३० रिक्षाचालकांवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये एका रिक्षाचालकावर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईच्या भीतीने स्थानक परिसरातून अनेक रिक्षाचालकांनी पळ काढल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत एनएमटी विभागाशी संपर्क साधला आणि रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी अतिरिक्त बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.