Press "Enter" to skip to content

जगन्नाथ आब्दागिरे ध्येय फाउंडेशन राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


खांब-रोहा,दि.३१(नंदकुमार मरवडे)

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यासाठी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५/२६ यावर्षी रा.जि.प.शाळा मढाळी बु.तालुका रोहा येथील कर्तृत्ववान, उपक्रमशील व समर्पित शिक्षक तथा पुगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जगन्नाथ हुलप्पा आब्दागिरे यांना प्रदान करण्यात आला आहे.

ध्येय फाउंडेशन, महाराष्ट्र तर्फे देण्यात आलेल्या या सन्मानामुळे जगन्नाथ आब्दागिरे यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.
पुणे येथील निगडी परिसरातील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात “एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२६ ” या भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा २९ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या हस्ते जगन्नाथ आब्दागिरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यातून केवळ एका आदर्श शिक्षकाची निवड करण्यात आली होती. अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेतून रोहा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जगन्नाथ आब्दागिरे यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे मानाचे स्थान पटकावले आहे.याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृती मोहिमा, पर्यावरण संवर्धन उपक्रम, तसेच समाजोपयोगी प्रकल्प राबवून त्यांनी शिक्षक या भूमिकेपलीकडे जाऊन समाजातही आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

या गौरवप्रसंगी पंचायत समिती रोहा चे वरिष्ठ सहायक अनिल खामकर तसेच सहकारी शिक्षक महेशकुमार जगताप यांनी तसेच आळंदी गावातील मित्र विश्वनाथ धानोरे,शंकर धर्मकरे काशिनाथ संगनाले व आनंद आटकले यांनी उपस्थिती दर्शवून अभिनंदन केले.तसेच त्यांच्या सुयशाबद्दल त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.