Press "Enter" to skip to content

महिला सन्मान स्वच्छता अभियान व सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर

“पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा” – ममता प्रितम म्हात्रे

पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी आज महापौरांकडे दोन महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव निवेदनाद्वारे सादर केले.

यामध्ये “महिला सन्मान स्वच्छता अभियान” अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अत्याधुनिक पिंक टॉयलेट्स (महिला सुविधा केंद्र) उभारण्याचा व्यापक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही केंद्रे केवळ सार्वजनिक स्वच्छतागृह नसून महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य व सन्मान लक्षात घेऊन विकसित केलेली बहुउद्देशीय सुविधा केंद्रे असतील.

या पिंक टॉयलेट्समध्ये आधुनिक व स्वच्छ शौचालयांसोबतच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, वापरलेल्या नॅपकिन्सच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर, तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रांच्या बाह्य भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल तसेच २४ तास महिला रक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आहे.
या सुविधा केंद्रांमध्ये सौर ऊर्जा (Solar Power) वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन (Rainwater Harvesting) आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळण्यासाठी पॅनिक बटण (Emergency Alarm) यांसारख्या स्मार्ट सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख वर्दळीची ठिकाणे जसे की रेल्वे स्थानके, बाजारपेठा, बस स्थानके, उद्याने व शासकीय कार्यालय परिसर येथे पहिल्या टप्प्यात २५ ते ५० पिंक टॉयलेट्स उभारण्याचा आराखडा सादर करावा अशी मागणी केली आहे.

या प्रकल्पासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तसेच विविध उद्योगांच्या CSR निधीचा वापर करून महापालिकेवरील आर्थिक भार कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांचे व्यवस्थापन स्थानिक महिला स्वयं-सहायता गटांकडे (Self Help Groups) देऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रमही या योजनेत समाविष्ट आहे.

या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होणार असून पनवेल शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ व महिलांसाठी अनुकूल शहर म्हणून विकसित होण्यास मोठी चालना मिळणार आहे.
तसेच राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान व हरित ऊर्जा धोरण अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गृहसंकुलांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबतही विस्तृत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे सोसायटी स्तरावर वीज निर्मिती, कॉमन सुविधांसाठी ऊर्जा पुरवठा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा तसेच नेट मीटरिंगचा वापर यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वीज खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांसाठी PPP (Public-Private Partnership) व CSR निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव असून, स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.

सौ. ममता म्हात्रे यांनी या प्रस्तावांमुळे पनवेल शहरात महिला सुरक्षा, स्वच्छता व हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती होऊन शहर “मॉडेल सिटी” म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच संबंधित विभागांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून हे प्रकल्प तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ मधून नैसर्गिक ऊर्जास्रोतांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याच्या धर्तीवर, असे स्मार्ट व शाश्वत प्रकल्प पनवेलमध्येही राबविणे ही काळाची गरज आहे. पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सौ.ममता म्हात्रे यांनी मांडलेले महिला सन्मान स्वच्छता अभियान आणि सौर ऊर्जा प्रकल्प हे अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि लोकहिताचे प्रस्ताव आहेत. महानगरपालिकेने या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आमची अपेक्षा आहे.”

— प्रितम जनार्दन म्हात्रे
भाजप नेते, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.