

पनवेल : प्रतिनिधी
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल(अधिकारप्रदात्त स्वायत्त) येथे पदवी, पदव्युत्तर आणि पी.एच.डी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते सन्माननीय श्री. रामशेठ ठाकूर व प्रमुख पाहुणे म्हणून लखनऊ विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माजी कुलगुरू, सन्माननीय प्रो.(डॉ.) एस. बी. निमसे यांनी भूषविले.
या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत , व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख , संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. अनिल भगत व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य अॅड. राहुल घरत तसेच संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांचे प्रमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.

या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र तसेच पी.एच.डी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या शानदार समारंभामध्ये एन.सी.सी.च्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरवात सुरेल राज्य गीताने झाली. त्यानंतर प्राचार्य मा. प्रो. (डॉ.)एस. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एन. परकाळे यांनी करून दिली.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रो.(डॉ.) एस. बी. निमसे यांनी आपल्या भाषणात भारताला विश्वगुरू बनण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि कौशल्याधारित ज्ञानाची आवश्यकता आहे. भविष्याचा विचार करता कसदार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि परदेशातून भारताकडे शिक्षणासाठी अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बौद्धिक कुतूहल, महत्त्वाकांक्षा आणि आपण निवडलेल्या क्षेत्राबद्दल सार्थ अभिमान हे तीन गुण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर देखील आपल्या महाविद्यालयाप्रती सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञ राहणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रमाण विद्यार्थिनींचे असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
मा. श्री. रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की, इच्छाशक्ती असेल तर संघर्ष करण्याची ताकद आपल्या पायात आपोआप येते. आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे यश मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. त्याचबरोबर या महाविद्यालयात मधून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगू काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक प्रो. (डॉ.) एस. आय. उन्हाळे, विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे समन्वयक प्रा. (डॉ.) एस. एन. परकाळे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक प्रो. (डॉ.) एस. आय. उन्हाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. (डॉ.) गीतिका तंवर, प्रा. ए. व्ही. पाटील आणि प्रा. एन. एच. कडू यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




Be First to Comment