
पनवेल : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ आणि पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी थर्मल मॅमोग्राफीद्वारे मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. पुष्पक चिरमाडे (MD, DM Oncology) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सौ. विजया सावंत, प्रिया खोबरेकर आणि प्रीता भोजने यांनी शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मंडळातील महिला भगिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाची साथ दिली.

यावेळी डॉ. ज्योती चिरमाडे (MD, DM Hemato-Oncologist) यांनी स्तन कर्करोगासह विविध कॅन्सरचे उपचार, तसेच मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आजारावर मात कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. मालती चिरमाडे यांनी महिलांनी आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करून वयोमानानुसार आरोग्य सुदृढ कसे ठेवावे, याबाबत उपयुक्त माहिती दिली.
या शिबिरात एकूण ४६ महिलांनी थर्मल मॅमोग्राफी तपासणी करून घेतली. सर्व तपासण्या पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटरतर्फे पूर्णतः मोफत करण्यात आल्या. याबद्दल संघाचे अध्यक्ष श्री. केशव राणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम कौटुंबिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून, महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला.




Be First to Comment