
खांब,दि.३०(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुका खांब विभागातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी मोबाईल साक्षरता’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
डिजिटल युगात तंत्रज्ञान क्षेत्रात जेष्ठ नागरिक सक्षम व्हावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय (इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत कार्याल खांबच्या सभागृहात ‘मोबाईल साक्षरता प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले होते.
या महत्त्वाच्या प्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत सोनावणे आणि नंदकुमार सकट यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलच्या विविध फिचर्सची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचा वापर, सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सुरक्षितता आणि उपयुक्त अॅप्स कसे वापरावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.या उपक्रमाला गावांतील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ३५ ज्येष्ठ नागरिकांनी या प्रशिक्षणात उत्साहाने सहभाग नोंदवला.यावेळी स्वतःच्या हाताने मोबाईल हाताळताना ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाशी जोडले जाऊन स्वावलंबी होतील.
-अविनाश म्हात्रे,
जेष्ठ नागरिक संस्था संचालक खांब




Be First to Comment