Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका हद्दीत स्तन कर्करोग तपासणी शिबिर

AI आधारित कॅन्सर तपासणी शिबिरामुळे आरोग्य जनजागृतीला चालना : सौ. ममताताई प्रितम म्हात्रे

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीत महिला व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या मोफत सामान्य आरोग्य व स्तन कर्करोग तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “आज केलेली एक छोटी तपासणी, उद्याचे आयुष्य सुरक्षित करेल” या संदेशातून जनजागृती करत, स्मार्ट हेल्थ AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे हे शिबिर प्रभावीपणे पार पडले. पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुढील 3 महिन्यांपर्यंत ही मोहीम राबवली जात आहे.

या शिबिरास पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून मा. सौ. ममताताई प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधून शिबिरामधील सुविधांची माहिती घेतली व महिलांनी अशा तपासण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिरामध्ये AI-आधारित स्तन कर्करोग तपासणी, रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी तसेच इतर महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात आली.

यावेळी मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी U-WIN डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून एचपीव्ही लसीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, शासकीय आरोग्य संस्थांमध्ये 14 वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

“महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर अनेक गंभीर आजारांवर मात करता येते. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत अशा आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट असून, प्रत्येक महिला व कुटुंब निरोगी राहावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

सौ.ममताताई प्रितम म्हात्रे
सभापती
महिला बालकल्याण समिती प.म.पा
.

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा विश्वास सभापती सौ.ममताताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.