Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये ४ एप्रिल रोजी ‘खुशरंग’ संगीत महोत्सव; दिग्गज कलाकारांची उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०४ एप्रिल रोजी पनवेलमध्ये भव्य ‘खुशरंग’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत रसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून, शास्त्रीय संगीत, भजन आणि कथक नृत्याचा संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे.

     शहरातील मार्केट यार्ड परिसरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सायंकाळी रंगणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तुर यांचे शिष्य पं. गिरीश संजगिरी, पं. पी.व्हि. कडलास्कर व पं. शंकर अभ्यंकर यांचे शिष्य पं. महेश कुलकर्णी यांचे गायन, त्यांनतर विनायक ललित व तनुश्री जोग यांचे गायन, पं. भाई गायतोंडे यांचे शिष्य पं. विनायक नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेला कथक नृत्य कलाविष्कार कार्यक्रम डॉ. वैशाली दुधे यांच्या शिष्या आर्या महाजन व ऋतुजा कुलकर्णी सादर करतील. समारोप उस्ताद अस्लम खान(खुशरंग), उस्ताद अजीम खान, भजनसम्राट ह.भ.प.निवृत्तीबुवा चौधरी व पंडिता शुभदाताई पराडकर यांचे शिष्य पं. उमेश चौधरी यांच्या गायनाने होणार आहे.

सदर कलाकारांना संवादिनी संगत विनायक ललित व स्मिता मनोहर; तबला साथ पं. महेश कान्होले, प्रसाद सुतार, विनायक नाईक, भक्ती जाधव, सुधिंद्र बागल; पखवाज साथ सोमदत्त माने; सहवाद्य साथ जगदिश म्हात्रे तर निवेदन सोपान आढाव करणार आहेत. या महोत्सवाचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतशेठ पाटील, विनोद तोडेकर, अक्षय चौधरी, अनिल कोळी यांनी केले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.