Press "Enter" to skip to content

चूक नव्हे घोडचूक, प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात जनतेतून संताप

कोरोना रिपोर्ट आला दहा दिवसांनी, निगेटिव्ह समजून झोतिरपाड्यातील कुटुंबप्रमुख राहिला निर्धास्त : वाढत्या संसर्गाला जबाबदार कोण ? जनतेत संताप

 

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

रायगड जिल्हयात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत असून बाधित रुग्णांची संख्या आता 20 हजाराच्या घरात गेली आहे. मात्र अजूनही प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात हवेतसे यश मिळाले आहे, असे म्हणता येणार नाही. पेण तालुक्यातील झोतिरपाडा विभागातील एका नागरिकाच्या कुटुंबातील एक सदस्य  कोरोना बाधित आढळून आला, त्यानंतर खबरदारी म्हणून कुटुंबातील सदस्यांची  तपासणी करण्यात आली, दरम्यान या घरातील कुटुंबप्रमुखाची  दि.4 ऑगस्ट रोजी swab test करण्यात आली होती. मात्र रिपोर्ट एक दोन तीन नव्हे तर तब्बल दहा दिवसांनी आला. अशातच आपण निगेटिव्ह आहोत, अस गृहीत धरून निर्धास्त राहिलेल्या “त्या” नागरिकाकडून कळत नकळत कोरोना संसर्ग फैलावला असेल तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता येथील जनतेतून विचारला जात आहे.

कोरोनाबाबत सर्वत्र संभ्रमावस्था आहे. शिवाय कोरोना या आजाराविषयी गाव खेड्यापाड्यात आवश्यक त्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याने कोरोना या साथ रोगाविषयी जनतेच्या मनात दाट भीती आहे. साधी सर्दी, खोकला व ताप आला, सामान्य लक्षण आढळून आली तरी कोरोना म्हणून त्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते, तर अनेकदा कोरोना असूनही लक्षण लपून राहिलेल्या व्यक्ती देखील निर्धास्तपणे फिरत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. 

याबरोबरच पॉजीटिव्ह व निगेटिव्ह अहवाल देखील उलट सुलट येत असल्याच्या बातम्यां मूळे देखील जणमाणसात संभ्रम दिसून येतोय.  तर दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे उशिराने येणाऱ्या रिपोर्ट मूळे अनेक समस्या व गंभीर परिणाम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  प्रशासनाच्या अशा हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे जीवितहानी देखील होण्याची भीती वर्तवली जात आहे.दरम्यान शिहू बेणसे झोतिरपाडा विभागात कार्यरत असलेली आरोग्य विभागाची टीम कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे बनून अहोरात्र काम करीत आहेत. मात्र अशा रिपोर्ट विलंब होण्यासारख्या  घटना भविष्यात घडू नयेत याकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्काळ लक्ष केंद्रित करून सकारात्मक बदल घडवून आणावेत अशी अपेक्षा जनमाणसातून व्यक्त होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.