
तिसरी मुंबईच्या ड्रोन सर्व्हे साठी गावोगावी येणाऱ्या
कन्सल्टंट कंपनीच्या कामगारांना गावकऱ्यांनी लावले पिटाळून
चिरनेर (अजित पाटील ): तिसरी मुंबईच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी रस्तोरस्ती रंगाच्या आधारे प्लॅटफॉर्म उभारणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी हुसकावून लावले असल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. सारडे गावातील रस्त्यांवर अशा प्रकारचे काळे पिवळे पट्टे मारण्यासाठी आलेल्या संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले असून पुन्हा या भागात याल तर परिणाम वाईट होतील असा सज्जड दम देखील दिला आहे.
उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 महसुली गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने के एस सी नवनगर नावाने तिसरी मुंबई उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने फसवी साडेबावीस टक्क्यांची योजना जाहीर केली आहे. मात्र आधीच्या सिडको आणि नवी मुंबईच्या विकसित भूखंड देण्याच्या अत्यंत वाईट अनुभवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी सरकारने दाखविलेले ही गाजर या पूर्वीच धुडकावून लावलेले आहे. मुंबईपासून अगदी 35 मिनिटांवर असलेल्या उरणच्या कोणाही शेतकऱ्याला सरकारची साडेबावीस टक्क्यांची योजना अजिबात मान्य नाही. त्याचबरोबर आधीचा अनुभव पाहता साडेबावीस टक्के सांगितले जात असते तरीही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ पावणेसोळा टक्के भूखंड मिळत आहेत. आणि हे भूखंड मिळविण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांचे विविध प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत. हा आकडा एका गुंठ्यामागे लाखो रुपयांच्या घरात जात असल्याने शेतकऱ्यांना ही साडेबावीस टक्क्यांची योजनाच मान्य नाही. तशा प्रकारची निवेदने देखील येथील के एस सी नवनगर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने राज्याच्या मुख्य मंत्र्यांसह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली आहेत.

असे असतानाच आत्ता सरकारच्या वतीने ड्रोन द्वारे जमिनीचा सर्व्हे करण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने के एस सी टाऊनसाठी जीआयएस आधारित विद्यमान भू-वापर आराखडा तयार करण्याकरिता’ मेसर्स टेककॉम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे साठी अत्यंत महत्वाचे असणारे काळे पिवळे आकाराचे पट्टे गावोगावी मारायला सुरूवात केली आहे. आधीच शेतकऱ्यांच्या विरोधाला सरकार कडून फाट्यावर मारले जात असतानाच गावोगावच्या रस्त्यांवर स्थानिक कोणत्याच प्राधिकरणाची साधी परवानगी देखील न घेता या पट्टे मारण्याच्या कृतीला गावकरी जोरदार विरोध करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून असे ड्रोन सर्व्हे च्या निमित्ताने गावकुसाबाहेर रस्त्यांवर काळे पिवळे पट्टे मारायला येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आत्ता शेतकरी हुसकावून लावू लागले आहेत.
सारडे येथील शेतकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावताना पुन्हा या भागात दिसलात तर परिणाम वाईट होतील असा सज्जड दम दिला आहे. गोवठणे गावात देखील अशाच प्रकाराचे पट्टे मारण्यात आले होते त्यावर येथील गावकऱ्यांनी काळे फासून सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. तिसरी मुंबई विरोधात येथील 25 हजार शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत त्या हरकतींवर साधी सुनावणी देखील न घेता सरकारने हा प्रकल्प या ठिकानी लादण्याचा अट्टाहास चालविला आहे. त्या या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आता गावोगावी ड्रोन सर्व्हे च्या साठी पट्टे मारायला येणाऱ्या काचाऱ्यांना पिटाळून लावले आहे चिरनेर गावात देखील तालुका प्रमुख संतोष ठाकूर आणि सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी या सर्व्हे कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले आहे.



Be First to Comment