Press "Enter" to skip to content

अष्टपैलू खेळाडूंच्या जीवावर उठणारा नियम….

२०२३ च्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सुरू करण्यात आलेला ‘ इम्पॅक्ट प्लेयर’ नियम आता कायम राहणार आहे.
आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ची मूळ संकल्पना ही आहे की, प्रत्येक संघातील एका पर्यायी खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजीने सामन्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळावी. परंतू आयपीएल मध्ये हा नियम वापरल्याने अष्टपैलू खेळाडूंच्या करिअर वर त्याचा गंभीर परिणाम होईल. एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करतो हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही. भारतीय प्रेक्षकांना मनोरंजनाने ओतप्रोत भरलेले सामने देण्याच्या प्रयत्नात नैसर्गिक क्षमता असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंवर हा नियम अन्याय करतोय.
         आयपीएल कौन्सिलने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे इम्पॅक्ट प्लेयर हा फंडा पुढच्या हंगामात देखील वापरला जाईल. यापूर्वी देखील रोहित शर्मा,हार्दिक पांड्या आणि अगदी काल-परवा अक्षर पटेल यांनी या नियमाला कडाडून विरोध केला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमित बदलीच्या नियमापेक्षा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. नियमित नियमानुसार, बदली क्षेत्ररक्षकाला दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी मैदानात उतरण्याची परवानगी असते, परंतु तो सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डोक्याला दुखापत झाल्यास बदली खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकत असले तरी, हा बदलीचा निर्णय दुखापतीमुळे घ्यावा लागतो, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाप्रमाणे तो डावपेचात्मक नसतो.
               आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर एक नजर टाकूया.आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे काय?तर आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमानुसार, संघांना सामन्यापूर्वी त्यांच्या अंतिम ११ खेळाडूंव्यतिरिक्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे जाहीर करण्याची परवानगी आहे.
सामना सुरू झाल्यावर, दोन्ही संघांचे कर्णधार सामन्यातील कोणत्याही नैसर्गिक विश्रांतीच्या वेळी, सुरुवातीच्या ११ खेळाडूंपैकी एकाच्या जागी खेळण्यासाठी या पाच पर्यायी खेळाडूंपैकी कोणालाही नामनिर्देशित करू शकतात. यामध्ये डावाची सुरुवात, षटकाचा शेवट, गडी बाद झाल्यावर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यावर येणाऱ्या विश्रांतीचा समावेश आहे.
परंतु जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने विकेट पडल्यानंतर किंवा षटकाच्या मध्यात फलंदाज निवृत्त झाल्यास इम्पॅक्ट प्लेअरला गोलंदाजीसाठी आणले, तर येणारा बदली खेळाडू त्या षटकातील उर्वरित चेंडू टाकू शकत नाही.मात्र, ज्या खेळाडूची जागा तो घेत आहे, त्याने बदली होण्यापूर्वी किती षटके टाकली आहेत याची पर्वा न करता, इम्पॅक्ट प्लेअर त्याच्या कोट्यातील पूर्ण चार षटके टाकू शकतो.सुरुवातीच्या अकरा खेळाडूंपैकी ज्या खेळाडूची जागा इम्पॅक्ट प्लेयर घेतो, तो सामन्यात पुढे खेळू शकत नाही. एका संघाला एका सामन्यात जास्तीत जास्त एकच इम्पॅक्ट प्लेयर बदली म्हणून वापरण्याची परवानगी आहे.मात्र, यात एक अट आहे. जर एखाद्या संघाने आपल्या सुरुवातीच्या ११ खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त परवानगी असलेले चार परदेशी खेळाडू निवडले असतील, तर ते केवळ एका भारतीय खेळाडूलाच ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवू शकतात. जर एखाद्या संघाने आपल्या सुरुवातीच्या ११ खेळाडूंमध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी परदेशी खेळाडू निवडले असतील, तर ते राखीव खेळाडूंच्या यादीतून दुसऱ्या एखाद्या परदेशी खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवू शकतात.
          कपिल देव, इम्रान खान, इयन बॉथम, जॅक कॅलिस अशा दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे त्या त्या देशाच्या संघाचा एक वेगळाच दरारा असायचा. मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यात अष्टपैलू स्पिनर्स ही एक वेगळी संकल्पना रुजते आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल ही प्रभावी नावे. आपण नुकत्याच जिंकलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हार्दिक पांड्याने केलेली अष्टपैलू कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. सध्याचा झटपट क्रिकेट म्हणून अल्पावधीत सुप्रसिद्ध होत असलेला T20 फॉरमॅट हा वास्तविक अष्टपैलू खेळाडू निर्माण करणारा फॉरमॅट आहे. जर याच फॉरमॅटमध्ये इम्पॅक्ट प्लेयर सारखे तुघलकी नियम घुसवले तर अष्टपैलू ही जातकूळ नष्ट होण्याची भीती निर्माण होते.
           भविष्यातील टॅलेंट शोधण्यासाठी जर बीसीसीआय आयपीएल कडे पाहत असेल तर त्यांनी या नियमाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अष्टपैलू खेळाडूंकडे नैसर्गिक उपज असली पाहिजे, असे खेळाडू नेटस मध्ये तयार केले जात नाही. ते खरच खूप स्पेशल असतात परंतु इम्पॅक्ट प्लेयर ही संकल्पना जर का प्रत्येक इनिंग मध्ये स्पेशलिस्ट प्लेअर घेण्याची सुविधा देत असेल कुणीही कोच अथवा कॅप्टन आपल्या टीम मध्ये अष्टपैलू खेळाडूची निवडच करणार नाहीत. त्यामुळे झाला तो खेळखंडोबा पुरे झाला किमान पुढच्या हंगामात तरी अष्टपैलूंच्या जीवावर उठणारा हा नियम रद्द करावा हेच उत्तम!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.