Press "Enter" to skip to content

चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सव देशभर साजरा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाड/ दि. – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे केलेल्या पाण्याचा सत्याग्रह हा ऐतिहासीक आणि युगप्रवर्तक सत्याग्रह होता. सामाजिक विषमतेवर मात करुन समतेच्या युगाचा आरंभ करणारा चवदारतळे सत्याग्रह ठरला आहे. हा मानवमुक्तीचा संगर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.

महाड चवदार तळे क्रांतीभूमीतील क्रांतीस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी राज्यसभेत तीनवेळा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, संपर्क प्रमुख राहुल सोनावले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, सुमित मोरे ; महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे; पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे, पनवेल महानगर पालिका कार्याध्यक्ष प्राध्यापक मोहन गायकवाड,
विवेक पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आपण कुठेच नसतो . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण संसदेमध्ये आणि केंद्रात मंत्री म्हणून पोहचु शकलो. चवदार तळे सत्याग्रहामुळे अस्पृश्यता नष्ट होवून दलितांना मानवतेचे अधिकार मिळाले. त्यामुळे चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवी हक्क लढ्यासाठी प्रेरणादायी आहे. समतेच्या हक्कासाठी प्रेरणादायी आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ना.रामदास आठवले यांनी पक्षबांधणी करण्याचे कडू डोस दिले.

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे मित्रपक्षाच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढु नये. रिपब्लिकन पक्षाने मोठया प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षासाठी गन्ना किसान (ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह मिळवले आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर आपण राहु, मात्र मित्रपक्षाच्या भरवशावर निवडणुका जिंकणे हे योग्य नाही. कार्यकर्त्यांना आयते काही मिळणार नाही. त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतील, कष्ट करुन मतदारसंघ बांधले पाहिजे. स्वबळावर निवडणुका जिंकण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. मित्रपक्षाच्या भरवशावर आणि मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुका लढणे आता कार्यकर्त्यांनी बंद केले पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद दाखवून दिली पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.