Press "Enter" to skip to content

महायुती सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन

आमदार विक्रांत पाटील यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण

मुंबई : प्रतिनिधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करत राज्यातील विकासाची दिशा स्पष्ट केली.

आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गतिमान आणि सर्वस्पर्शी प्रशासन राबवले जात असल्याचे नमूद केले. “हे सरकार आता जनतेचे ‘हक्काचे सरकार’ बनले आहे,” असे ते म्हणाले. राज्याने 2024-25 या कालावधीत देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित केली असून ₹1,64,875 कोटींहून अधिक गुंतवणूक प्राप्त झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्राचा देशाच्या एकूण उत्पादनात 13.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.


आमदार पाटील यांनी सांगितले की, ‘विकसित भारत 2047’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाशी सुसंगत ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा आराखडा राज्याने तयार केला आहे. फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल करताना व्हिजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली असून विविध क्षेत्रनिहाय धोरणे राबवली जात आहेत. बांबू उद्योग धोरण 2025, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, ॲनिमेशन-व्हिज्युअल इफेक्ट्स-गेमिंग (AVGC) धोरण यांसारख्या उपक्रमांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू असून येत्या पाच वर्षांत 1.25 लाखांहून अधिक उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर ते पूर्व विदर्भ जोडण्याचा उपक्रम, कोकणातील हस्तांतरण व्यवहार नियमाधीन करण्याचा निर्णय, एने टॅक्स रद्द करणे, शेतकऱ्यांसाठी बारमाही शेतरस्ते योजना, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत प्रकल्प यांसारख्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
“नुसते शिक्षण नव्हे तर कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगानुरूप मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी स्थानिक युवकांना सक्षम करण्याचे धोरण सरकार राबवत आहे,” असे सांगून आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.