Press "Enter" to skip to content

रायगडमध्ये एकाच वेळी २२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे विशाल स्वच्छता अभियान उत्साहात

पाण्याचे रक्षण म्हणजे सृष्टीचे खरे संरक्षण ; सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज

महाड : रघुनाथ भागवत

पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. जीवनाचा मूलाधार आणि मानवसभ्यतेची जीवनरेखा असलेले हे जल स्वच्छ व संरक्षित राहिले, तर केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवसमाजाचे एकूण आरोग्य आणि संतुलन अधिक सक्षम होते. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवारी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत, सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील नद्यांसह शहरातील विविध तलाव, विहीरी अशा एकूण २२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.

रायगड जिल्हयामध्ये खोपोली, सावरोली, मार्केवाडी, तिवरे, पेण, बोर्वे, रोहा, कोंडगाव, अलिबाग, पोयनाड, सारळ, भिलजी, खरसई, भरडखोल, श्रीवर्धन, वडवली, खरवली, कडापे, चोरवली, महाड, बिरवाडी तसेच रावतळी या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी येथील सावित्री आणि काळ नदी संगमच्या परिसरात तसेच केतकीचा कोंड (भवानी नगर) वाळण बु. येथील विहीरीसह परिसरामध्ये आणि पारदुलेवाडी येथे तलावाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य व प्रेरणादायी आयोजन सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमित जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १ हजार ६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीपणे पार पडले. या अभियानात सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला अशी माहिती संत निरंकारी मंडळाचे खरसई (रायगड) चे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी दिली.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिवांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. देशभर प्रसारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आयोजनाची सुसूत्र आणि संस्कारित कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली. याच वेळी खुल्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उल्लेखनीय म्हणजे, संत निरंकारी मिशन वेळोवेळी समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत आले आहे. ‘वननेस वन’ अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि ‘प्रोजेक्ट अमृत’च्या माध्यमातून जलसंरक्षणाचे प्रयत्न हे मानव आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणारे प्रभावी पाऊल ठरत आहेत.

निःसंशय, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.