

कोकण रेल्वेच्या ‘तेजस एक्सप्रेस’चा सावळा गोंधळ; प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत रेल्वे मंत्र्यांकडे मागितली दाद
पनवेल | प्रतिनिधी
भारतीय रेल्वेची ‘प्रिमियम’ सेवा म्हणून ओळखली जाणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) ते मडगाव तेजस एक्सप्रेस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तासनतास उशिराने धावत आहे. या विलंबाचा फटका ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना बसत असून, रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात पनवेल शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी थेट रेल्वे मंत्र्यांकडे दाद मागितली आहे.
होळीच्या तोंडावर कोकणवासीयांचे हाल
पुढील आठवड्यात कोकणचा सर्वांत मोठा सण ‘होळी’ (शिमगा) येत आहे. या उत्सवासाठी हजारो चाकरमानी तेजस एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करतात. मात्र, गाडीच्या सततच्या विलंबामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे. “प्रवाशांनी जादा भाडे मोजूनही त्यांना साध्या गाडीसारखा अनुभव येत असेल, तर रेल्वेच्या प्रतिमेचे काय?” असा सवाल निलेश सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
प्रवाशांच्या मुख्य समस्या:
आरोग्याचा प्रश्न: गाडी तासनतास खोळंबल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वेळेवर औषधे घेणे कठीण होत आहे.
नोकरदारांचे नुकसान: वेळेचे नियोजन करून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक आणि नोकरदारांची महत्त्वाची कामे रद्द होत आहेत.
गाडी उशिरा असताना प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने स्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे.
रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
या संदर्भात निलेश सोनावणे यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव , केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
तेजस एक्सप्रेसच्या विलंबाचे तांत्रिक कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करावी.ज्यांचा पुढील विलंबामुळे प्रवास चुकला तर त्या प्रवासाचा खर्च मग तो विमान प्रवास असो का रेल्वे बस त्याचा सर्व खर्च रेल्वे प्रशासनाने त्वरित प्रवाशांना द्यावा, गाडी उशिरा असल्यास प्रवाशांना SMS द्वारे आगाऊ सूचना मिळावी. विलंबाच्या काळात रेल्वे स्थानकांवर व प्रवासात अडकून पडलेल्या प्रवाशांना मोफत अल्पोपहार व पाण्याची विशेष सोय करावी.
“तेजस एक्सप्रेस ही वेगासाठी ओळखली जाते, पण सध्या ती विलंबाचा नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. विशेषतः होळीच्या काळात कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल
— निलेश सोनावणे (अध्यक्ष, पनवेल शहर आरपीआय – आठवले)






Be First to Comment