Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा

भाजपा प्रदेश कार्यकारिणीत आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीस पदाची जबाबदारी

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. या प्रदेश कार्यकारिणीत आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीस पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली. 

         त्याशिवाय आमदार निरंजन डावखरे, आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली.पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतरच्या काळात निवडणूक आचारसंहिता आणि एका पाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकारी नेमणुका या निवडणुकीनंतर कराव्यात असा निर्णय भाजपाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी घेतला होता. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृह मंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींसोबत चर्चा केली असे त्यांनी सांगितले.

        तसेच भाजपाच्या घटनेप्रमाणे आणि महाराष्ट्रातील परिस्थिती याचा विचार करता कुणाला पदाधिकारी करावे आणि कुणाला नाही यापेक्षाही भाजपाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रत्येक जण अतिशय सक्षम आहे. प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते. मग अशावेळी ज्यांना कुणाला संधी मिळते त्यांचे सर्वजण अभिनंदन करतात. ज्यांची आज पदाधिकारी म्हणून नेमणूक होणार आहेत, त्याव्यतिरिक्त असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ज्यांना संधी प्रदेश कार्यकारिणीत देता आली नाही. परंतु भाजपा आणि वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येईल याचा सर्वांगीण विचार माझ्यासह सर्व पदाधिकारी नक्की करू अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशिल पाटील, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते. 

       या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे, अर्चना पाटील चाकूरकर, सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, चिटणीसपदी  प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा ढहाळे, संतोष जनाटे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी वाघ,  कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, सह कोषाध्यक्ष अरुण लखानी, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्यालय सहप्रभारी विश्वास पाठक, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक, महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, ओ. बी.सी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, एस. सी मोर्चा अध्यक्ष विश्वजित गायकवाड, एस.टी मोर्चा अध्यक्ष देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष नरेंद्र पवार, तर अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्षपदी  इद्रिस मुलतानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  दरम्यान, भाजपाच्या कार्यपद्धतीत ३ वर्षात पदाच्या जबाबदाऱ्या बदलत असतात. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने काम करत असतो. कार्यपद्धतीप्रमाणे नवीन चेहऱ्यांसोबत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.