
धोकादायक ड्रेनेज टँकमधून गाभण गायीची सुखरूप सुटका
खोपोली. : प्रतिनिधी
खोपोली शहरातील मोगलवाडी डीपी रस्त्यालगत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या ड्रेनेज टँकचे झाकण तुटल्याने एका गाभण गायीचा टँकमध्ये पडून अपघात झाला. टँकमध्ये सुमारे सात ते आठ फूट पाणी साचलेले असल्याने गायीला हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती. घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
गायीच्या मालकांकडून ती गाय गाभण असल्याची माहिती मिळाल्याने बचावकार्य अधिक काळजीपूर्वक राबविण्यात आले. प्रथम सक्शन पंपाच्या सहाय्याने टँकमधील काही प्रमाणात पाणी उपसण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्रणा आणि मानवी साखळीच्या मदतीने टँकची भिंत नियंत्रित पद्धतीने फोडण्यात आली.

जवळपास दोन तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गायीला कोणतीही गंभीर इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि समन्वयपूर्ण बचावकार्यासाठी खोपोली नगरपालिकेचे परिवहन सभापती किशोर पाटील यांनी दोन्ही पथकांचे कौतुक केले. तसेच गायीच्या तपासणी व उपचारासाठी पशुवैद्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले.
दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निर्माणाधीन ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सावंत यांनी सांगितले.
सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी तत्परता, संयम आणि समन्वय यांच्या जोरावर एका मुक्या जीवाचे प्राण वाचवण्यात यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.





Be First to Comment