
सुमारे सात ते आठ फूट लांबीच्या अजगराला आगीपासून वाचवले
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहरातील लव्हेज गावाजवळील डोंगरपट्ट्यामध्ये भीषण वणवा पेटला होता. सर्वत्र धूर, आगीच्या ज्वाळा आणि भीतीचे वातावरण होते. अशा संकटाच्या क्षणी वनकर्मचारी आणि स्थानिक आदिवासी जीवाची पर्वा न करता वणवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते.
याच दरम्यान त्यांच्या नजरेस एक हृदयद्रावक दृश्य पडले, तेथे अजगर जातीचा साप धगधगत्या ज्वाळांमधून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ वनपाल भगवान दळवी यांच्या माध्यमातून हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला. क्षणाचाही विलंब न करता गुरुनाथ साठेलकर आणि दिनेश ओसवाल यांनी घटनास्थळी धाव घेत वनपाल भगवान दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सात ते आठ फूट लांबीच्या अजगराला अत्यंत दक्षतेने सुरक्षित पकडले.
सभोवताली पेटलेल्या वणव्याच्या ज्वाळांमधून मार्ग काढत त्या अजगराला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तज्ज्ञांकडून त्याच्यावर आवश्यक उपचार करून त्याला सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली.
ही केवळ एका सापाची सुटका नव्हे, तर मानवतेने निसर्गाशी जोडलेले नाते जपण्याची जिवंत साक्ष आहे.
वनपाल भगवान दळवी यांनी यावेळी भावनिक शब्दांत सांगितले की,
“वणवे विझवण्यासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू असतात; मात्र असे वणवे लागूच नयेत यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. अशा आगींमुळे वनसंपत्तीचे अपरिमित नुकसान होतेच, पण असंख्य निष्पाप जीवांचाही नाहक बळी जातो.”





Be First to Comment