Press "Enter" to skip to content

जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

पुरुषांमध्ये ओमकार वेश्वी, महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी विजेते  

पनवेल (हरेश साठे) गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर पार पडलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६’ स्पर्धेत पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी तर महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी संघाने विजेतेपद पटकाविले. 

        दिनांक २० ते २२ फेब्रुवारी अशा तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १२८ पुरुष तर ३२ महिला संघांनी सहभाग घेतला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन, पंचांची काटेकोर आणि निष्पक्ष कामगिरी तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला भव्य यश लाभले आहे. संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून खेळाडूंनीही उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले. आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा क्रीडा सोहळा संस्मरणीय ठरला आहे.हि स्पर्धा अत्यंत दिमाखदार आणि खेळाडूंसाठी सर्व सुविधांनी संपन्न झाली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी संघाने शिवाई बांधण संघाला पराभूत करून अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे शिवाई बांधण संघ उपविजेते ठरले. तृतीय क्रमांक जय बजरंग रोहा तर चतुर्थ क्रमांक जयभवानी वाशी पेण संघाने मिळवले. महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विजेता संघ ठरला. उपविजेता पनवेल स्पोर्ट्स क्लब पनवेल संघ, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे ओमकार वेश्वी व दत्तात्रेय क्रीडा पनवेल संघाने मिळविला. या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडू तसेच स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या कबड्डीतील ज्येष्ठ कबड्डीपटू मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

       माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील, शिवसेना उबाठा गटाचे ज़िल्हा संघटक प्रमुख प्रसाद भोईर, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, स्पर्धा सचिव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद पाटील, प्रफुल्ल पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक जे. जे. पाटील, खजिनदार जगदीश पाटील, संजय मोकल, प्रथमेश पाटील, संदेश बैकर, जनार्दन पाटील, नरेश म्हात्रे, ओमकार पिंगळे, लक्ष्मण गावंड, अजिंक्य पाटील, पांडुरंग पाटील, संकेत पाटील, उल्हास पाटील, अनिल राऊत, माजी सरपंच चिंतामण भोईर, सी. एल.ठाकूर, अपूर्व ठाकूर, श्रीकुमार नायर यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक, कबड्डीप्रेमी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        ग्रामीण मातीतल्या सुगंधातून जन्मलेला कबड्डी हा खेळ आज जागतिक पातळीवर दिमाखाने झेपावला आहे. गावकुसाबाहेरच्या माळावर खेळला जाणारा हा खेळ आता प्रकाशझोतात आला असला, तरी त्याची खरी ताकद अजूनही खेळाडूंच्या जिद्दीमध्ये आणि संघभावनेतच दडलेली आहे. हि स्पर्धा म्हणजे केवळ सामने नव्हते, तर प्रत्येक खेळाडूसाठी स्वतःला सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी होती. राज्यस्तरीय स्पर्धांकडे वाटचाल करण्यासाठी ही निवड चाचणी निर्णायक ठरणार असल्याने मैदानावर प्रत्येक क्षण महत्वाचा होता. शिट्टी वाजताच खेळाडूंच्या डोळ्यांत जिद्दीची ज्वाला आणि मनात विजयाची आस स्पष्ट दिसत होती. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांतील सामने प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरली. चढाई करताना खेळाडूंचा विजेच्या वेगाने पुढे जाणारा डाव, “कबड्डी… कबड्डी…” म्हणत घेतलेली झेप आणि त्याला रोखण्यासाठी बचावपटूंची साखळीबद्ध पकड या सगळ्यांनी वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. प्रत्येक पकडीत ताकद, प्रत्येक चढाईत धाडस आणि प्रत्येक गुणात संघभावना दिसून येत होती. अनेक सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगले. एका गुणासाठी सुरू झालेली झुंज अखेरच्या श्वासापर्यंत ताण निर्माण करत होती. काही खेळाडूंनी आपल्या अचूक चढायांनी सामन्याचा कल पालटला, तर काहींनी भक्कम बचाव करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले. मैदानावरचा प्रत्येक क्षण रोमांचकारी ठरत होता. स्पर्धेच्या ठिकाणी कबड्डीप्रेमींची मोठी उपस्थिती लक्षवेधी होती. टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष आणि घोषणांनी खेळाडूंचा उत्साह दुणावला. खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातील ही ऊर्जा स्पर्धेला अधिक रंगतदार बनवत होती. या स्पर्धेतून गुणवान खेळाडू पुढील राज्यस्तरीय स्तरावरही आपला ठसा उमटवतील, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे हि स्पर्धा जिल्हा नाही तर राष्ट्रीय स्तरावरची असल्याचे नियोजनातून अधोरेखित होत होते. 

“पाच दशकांच्या समाजसेवेचा अमृत महोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कबड्डीत गौरव”जनसामान्यांच्या हृदयात घर करणारे आणि समाजकार्यातून लोकांचे जीवन उजळवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे नाव आज विश्वास, कार्यतत्परता आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक बनले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणालाच जीवनाचे ध्येय मानणाऱ्या या नेतृत्वाने गेली पाच दशके समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. आजही त्याच ऊर्जेने आणि तळमळीने ते समाजहितासाठी कार्यरत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी (७५व्या) वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवातून अध्यात्मिक संस्कारांची जागृती, भजन स्पर्धांमधून भक्तीभावाचा सुरेल संगम, रक्तदान शिबिरातून मानवतेची जपणूक, शिधा वाटपातून गरजूंना आधार, विविध क्रीडा स्पर्धांमधून तरुणाईला प्रोत्साहन, नाट्य महोत्सव व वक्तृत्व स्पर्धांमधून सांस्कृतिक आणि बौद्धिक विकास, तसेच संगीत मॅरेथॉनमधून कलागुणांना व्यासपीठ अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जनोत्सव ठरत आहे. याच उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा’ उत्साहात पार पडली. खेळाडूंच्या जोशपूर्ण खेळाने मैदान दणाणून गेले, तर प्रेक्षकांच्या जल्लोषाने वातावरण भारावून गेले. हा अमृत महोत्सव केवळ वाढदिवसाचा सोहळा नसून, तो समाजसेवेच्या पाच दशकांच्या सुवर्ण प्रवासाचा उत्सव आहे या स्पर्धेच्या निमित्ताने कबड्डी असोसिएशन व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचा गौरव करत त्यांच्या समाजसेवेच्या प्रवासाला सलाम केला. 

कबड्डीत अजितदादांचे स्मरण 
कबड्डी हा आपल्या मातीतला अभिमानाचा खेळ आहे, आणि या खेळाशी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अतूट नाते होते. त्यांनी कबड्डीला केवळ क्रीडा म्हणून नव्हे, तर ग्रामीण संस्कृतीचा आत्मा म्हणून जपले. राज्यभरातील स्पर्धांना उपस्थित राहून, खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आणि संघटनांना पाठबळ देऊन त्यांनी या खेळाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. विशेषतः रायगड कबड्डी संघ याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. रायगडमधील खेळाडूंच्या जिद्दीचे आणि कष्टाचे ते नेहमीच कौतुक करत असत. त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आणि कबड्डीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. याच भावनेतून या स्पर्धेत अजितदादांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याची आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेची आठवण करून देत, उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या प्रेरणेने कबड्डीचा हा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी केला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.