
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील यांची पनवेल पालिकेत स्वतंत्र दालनाची मागणी
पनवेल दि.२३(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेतील राजकीय वातावरण शिवसेना उपनेते बबन पाटील यांच्या विधानामुळे चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाच नगरसेवकांसह महाविकास आघाडीतील इतर दोन सहकाऱ्यांनी आज पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन स्वतंत्र दालनाची मागणी केली. “आम्ही तांत्रिकदृष्ट्या पाच दिसत असलो, तरी प्रत्यक्षात सात नगरसेवक आमच्यासोबत आहेत,” असे ठाम प्रतिपादन बबन पाटील यांनी यावेळी केले.
पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपला अंगावर घेण्यासाठी आता महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या (उबाठा) पाच नगरसेवकांसह, काँग्रेस आणि शेकापच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रत्येकी एका नगरसेवकाने ही वज्रमूठ बांधली आहे. गट स्थापनेच्या प्रक्रियेत पाच जण शिवसेनेच्या गटात तर दोन जण शेकाप-काँग्रेस आघाडीच्या गटात दिसत असले, तरी कामकाजासाठी हे सातही जण एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे व नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांची शिवसेना उपनेते बबन पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामादास पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, गटनेत्या लीना गरड, नगरसेविका प्रिया गोवारी, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, नगरसेविका रितिक्षा गोवारी, नगरसेविका मेघना घाडगे, नगरसेविका प्रगती कैलास पाटील, नगरसेविका आर्या जाधव, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव,नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, संतोष गोळे, सुनिल गोवारी, कैलास पाटील, सदानंद शिर्के आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपनेते बबन पाटील म्हणाले की, “आमची ही युती भक्कम असून आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पालिकेत जनतेचे प्रश्न मांडणार आहोत. गटनेत्याला नियमानुसार मिळणारे स्वतंत्र कार्यालय किंवा दालन आम्हाला मिळावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.” या नव्या समीकरणामुळे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगामी काळात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






Be First to Comment