Press "Enter" to skip to content

चालकाचे प्रसंगावधान ; रस्त्याच्या आरसीसी रिटेनिंग वॉलला दिली जाणीवपूर्वक धडक

२१ टन प्रोपिलीन गॅस टँकरचा ब्रेक फेल; सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजताच्या सुमारास एक संभाव्य भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कोचीहून गुजरातकडे २१ टन क्षमतेचा प्रोपिलीन (Propylene) गॅस वाहून नेणारा टँकर (वाहन क्रमांक: NL.01 AF.5040) बोरघाट परिसरात येत असताना चालकाच्या लक्षात आले की वाहनाचे ब्रेक निकामी झाले आहेत. समोर तीव्र उतार आणि धोकादायक वळणे असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडक देत टँकर नियंत्रित केला. त्यामुळे टँकर जागीच थांबला आणि मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणेची फायर ब्रिगेड, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची टीम आणि पेट्रोलिंग वाहनांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.

हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, दाब, गळतीचा धोका आदी बाबींची तपासणी करून सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली. क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत हलविण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली. खोपोली पोलीस स्टेशन मध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सदर टँकर ओढणारे वाहन पूर्णतः निकामी झाले असून, दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने टँकर गुजरातकडे रवाना करण्यात येणार आहे.

अलिकडच्या काही दिवसांत प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सलग दुर्घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. उतारावर ब्रेक फेल झाल्यानंतर वाहन अनियंत्रित झाले असते, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणीय नुकसान होऊ शकले असते.

या पार्श्वभूमीवर धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक तपासणी, नियमित फिटनेस चाचण्या आणि संबंधित कंपन्यांनी विशेष सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.