
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ चे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार
सिटी बेल : विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) दुसऱ्या टप्प्याचे काम यावर्षी पावसाळ्यानंतर सुरू होईल. यासाठी अदानी समूहाने ₹३०,००० कोटींची गुंतवणूक केली आहे. अदानी समूहाच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी नुकतेच प्रसिद्ध माध्यमांशी संवाद साधताना उपरोक्त माहिती दिली.
अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग म्हणाले की, विमान कंपन्यांनी सर्व उपलब्ध जागांचा वापर योग्य पद्धतीने केला आहे त्यामुळे ही प्रगती सहज साध्य झाली आहे. त्यांनी नवीन विमान वाहतूक केंद्राची मागणी सातत्याने केली होती. अशातच आणखीन तीन विमान कंपन्या भारतीय प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाकीच्या टर्मिनल्स वरती वाहतूक सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.
२५ डिसेंबर रोजी उड्डाणे सुरू केल्यानंतर १९ दिवसांच्या आत, मर्यादित उड्डाणे असताना देखील १२ जानेवारी रोजी एनएमआयएने १००,००० प्रवाशांचा टप्पा गाठला. १२ तासांच्या ऑपरेशनवरून, एनएमआयए २४ तासांच्या ऑपरेशनकडे वळत आहे. २०२७ च्या जून पासून सुरु होणाऱ्या तिमाहीत ग्रीनफील्ड विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत.
विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसरी धावपट्टी आणि टर्मिनलचा समावेश असेल, ज्यामध्ये प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढवली जाईल अर्थातच त्यामुळे एनएमआयए पश्चिम भारतातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थान मिळवेल. त्यामध्ये प्रवासी टर्मिनल २ समाविष्ट असेल, हे टर्मिनल ३० दशलक्ष प्रवाशांची क्षमता वाढवेल, एक प्रमुख कार्गो टर्मिनल आणि पाच मोठ्या हँगर्ससह भारतातील सर्वात मोठी देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) सुविधा नवी मुंबई विमानतळावर असेल असेल.
टर्मिनल २ हे २०२९ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. सर्व ४ टर्मिनल २०३५-३६ पर्यंत तयार होतील. सर्व चारही टर्मिनल्स एकमेकांशी जोडण्यासाठी ऑटोमेटेड पीपल मूव्हर्स (एपीएम) बनवले जातील.
एकूण ४ टर्मिनल असतील ज्यांची एकत्रित क्षमता ९० एमपीपीए (वार्षिक दशलक्ष प्रवासी) असेल.





Be First to Comment