


पळस्पे : प्रतिनिधी
अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते देवदूत स्वयंसेवकांचा गौरव
रस्ते सुरक्षा अभियान २०२६ च्या समारोप कार्यक्रमानिमित्त रायगड परिक्षेत्रातील महामार्ग सुरक्षा पथकाच्या पळस्पे येथील नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
रायगड परिक्षेत्रात वाढती वाहतूक, सातत्याने घडणारे अपघात आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयाची गरज भासत होती. संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाची जागा निश्चित करून अतिक्रमण हटवले व आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा पूर्ण करत हे कार्यालय उभारण्यात यश मिळवले. या उपक्रमामुळे महामार्ग सुरक्षा व्यवस्थेला स्वतंत्र व सक्षम अधिष्ठान प्राप्त झाले आहे.
या कार्यालयामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी,वाहतूक नियमन व सातत्यपूर्ण देखरेख, ई-चलान प्रणालीची काटेकोरपणे राबवता येईल, अपघात नियंत्रण व तात्काळ मदत व्यवस्थेचे बळकटीकरण होईल.
कार्यक्रमात अपघातग्रस्तांना मदत करून जीवनदान देणाऱ्या ‘देवदूत’ स्वयंसेवकांचा, हेल्प फाउंडेशन, सह्याद्री वन्यजीव संरक्षक समिती अशा सामाजिक संस्थां, महामार्गावरील देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, मृत्युंजय देवदूत यांच्यासह कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पत्रकार, उद्योजक, वाहतूकदार आणि नागरिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अपघाताच्या क्षणी तत्परतेने धावून जाणाऱ्या या मदतनीसांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपअधीक्षक पुष्पलता दिघे, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, विनोद माळवे, दिपाली जाधव, वैभव रोंगे, पीएसआय देविदास नाईक, पीएसआय संजय टिळेकर तसेच जिल्ह्यातील महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, कंटेनर यार्ड प्रतिनिधी, वाहतूकदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पळस्पे येथील नूतन प्रशासकीय कार्यालयामुळे रायगड परिक्षेत्रातील महामार्गांवरील शिस्त, सुरक्षितता आणि प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम होणार आहे.
महामार्ग सुरक्षा यंत्रणेचे बळकटीकरण आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यांचा संगम साधत “सुरक्षित प्रवास – सुरक्षित जीवन” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारेल असा मनोदय यावेळी व्यक्त होत होता.



Be First to Comment