

रा जी प शाळा जांभिवली वाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल / प्रतिनिधी
येथील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली वाडी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जांभिवली वाडीवर पहिल्यांदाच शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते. दोन दिवस आधीपासून छत्रपतींच्या जयंतीची विद्यार्थी अतिशय उत्साहाने पूर्वतयारी करीत होते. शिवजयंती सोहळ्यासाठी संपूर्ण शाळेचा परिसर रांगोळ्या व तोरणे यांनी सजवण्यात आला होता.
सर्वप्रथम सकाळी ९ वाजता शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक संपूर्ण जांभिवली वाडीच्या परिसरातून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी ठीक ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. संपूर्ण गावात फिरून झाल्यानंतर मिरवणूक पुन्हा शाळेमध्ये आणली आणि तेथे मिरवणुकीची सांगता झाली. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते राजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. उपस्थितांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या लहान विद्यार्थिनींनी राजांच्या जीवनावर आधारित गाणी म्हटली.शिवरायांचे बाळपण जागे करण्यासाठी सुंदर अशा राजांच्या पाळणा गीतावर केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर शाळेच्या उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी शिवरायांच्या बालपणीची व त्यांच्या पराक्रमाविषयीची माहिती सांगितली.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा शिवरायांच्या पराक्रमाविषयी माहिती सांगितली, शिवरायांचे असणारे गुण आजच्या पिढीसाठी किती जरुरीचे आहेत,आपण त्याचे कशाप्रकारे पालन करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अंतिम चरणात शाळेच्या उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची अतिशय उत्साहात सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली येथील माजी सरपंच देवकी महादू निकम, अंगणवाडी सेविका हिरा निकम, मदतनीस अस्मिता कोंडीलकर, स्वयंपाकी म्हणून काम पाहणाऱ्या रसिका कोंडीलकर, स्वयंपाकी मदतनीस पारूबाई, प्रेरणा संस्थेच्या मार्गदर्शक ताई संजीवनी रायकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम शाळेत होत असल्याने सर्व पालक वर्ग अतिशय आनंदित होता. अशा या गोड दिवसाचा शेवट विद्यार्थ्यांना व पालकांना खाऊ वाटप करून करण्यात आला. विशेष म्हणजे जांभिवली वाडी रा जी प शाळेमध्ये अशाप्रकारे उत्साहामध्ये प्रथमच शिवजयंती साजरी झाल्याने व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक सुरेश म्हात्रे, शिक्षिका ज्योती भोपी आणि तमाम आयोजकांचे आभार मानले.



Be First to Comment